पुढारी ऑनलाईन डेस्क: पुढील पाच दिवस शुक्रवार १७ मे ते मंगळवार २१ मे दरम्यान राजस्थान, पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेशच्या काही भागात उष्ण वारे वाहण्याची शक्यता आहे. त्यामुळे उष्णतेच्या लाटेचा इशारा (Heat Wave) भारतीय हवामान खात्याने दिला आहे.
सध्या देशातील अनेक भाग उष्णतेने त्रस्त आहेत. राजधानी दिल्लीत गुरुवारी या हंगामातील सर्वात उष्ण दिवसाची नोंद झाली. गुरुवारी दिल्लीत कमाल तापमान ४२.५ अंश सेल्सिअस नोंदवले गेले, जे सामान्यपेक्षा दोन अंश सेल्सिअस जास्त आहे. शुक्रवारी देशातील अनेक भागात कमाल तापमान ४४ अंश सेल्सिअसपर्यंत जाऊ शकते. तर शनिवारी कमाल तापमान ४५ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचू शकते (Heat Wave), असे देखील भारतीय हवामान विभागाकडून दिलेल्या बुलेटीनमध्ये स्पष्ट करण्यात आले आहे.
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी (दि.१६) देशात अनेक ठिकाणी तापमान ४३ अंश सेल्सिअस ते ४६ अंश सेल्सिअसपर्यंत होते. विशेषतः राजस्थानच्या बहुतांश भागात, दक्षिण हरियाणातील काही जिल्ह्यांमध्ये, गुजरात, उत्तर प्रदेश, बिहार आणि मध्य प्रदेशातील काही ठिकाणी तापमान ४३ अंश सेल्सिअसपेक्षा जास्त नोंदवले गेले. हे सामान्य तापमानापेक्षा २ ते ४ अंश सेल्सिअस जास्त आहे, असे देखील हवामान खात्याने म्हटले आहे.
पुढील पाच दिवस १७ मे ते २१ मे दरम्यान राजस्थान, पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेशच्या काही भागात, १८ मे ते २१ मेमध्ये उत्तर मध्य प्रदेशात, १८ ते २१ मे दरम्यान पश्चिम राजस्थान, पंजाब आणि हरियाणा आणि दिल्लीच्या काही भागात प्राणघातक उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. तर उप-हिमालयीन भागात आणि पश्चिम बंगालमध्ये १७ मे रोजी आर्द्रता आणि उष्णतेमुळे लोक त्रस्त होतील असा अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तवला आहे.
हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, शुक्रवारी (दि.१७) तामिळनाडू, पुद्दुचेरी, कराईकलच्या काही भागात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच आज अरुणाचल प्रदेश, आसाम, मेघालय, किनारी कर्नाटक, दक्षिण अंतर्गत कर्नाटक आणि केरळमध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे.
हे ही वाचा: