अवकाळीने पालिकेचा कारभार चव्हाट्यावर.. रस्त्यांवर तुंबले पाणी! | पुढारी

अवकाळीने पालिकेचा कारभार चव्हाट्यावर.. रस्त्यांवर तुंबले पाणी!

महर्षिनगर : पुढारी वृत्तसेवा : पहिल्याच अवकाळी पावसाने मार्केट यार्ड परिसरात पाणी तुंबल्याने महापालिका प्रशासनाचा कारभार चव्हाट्यावर आला आहे. नुकत्याच झालेल्या अवकाळी पावसाचे पाणी ठिकठिकाणी पाणी तुंबल्याचे चित्र दिसून आले. परिणामी, पावसाळी वाहिन्यांचे चेंबर उघडण्याची वेळ नागरिकांवर आली. मे महिन्यापूर्वी पावसाळी वाहिन्या साफ करण्याचे आयुक्तांचे आदेश या भागात धाब्यावर बसविण्यात आल्याचे चित्र यानिमित्ताने दिसून आले. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही कामे झाली नसल्याचे सांगितले जात आहे.

मार्केट यार्ड परिसरात नेहरू रस्ता, पोस्ट ऑफिस चौक ते बस डेपो परिसरात अनेक ठिकाणी पावसाचे पाणी जिरवण्यासाठी चेंबरची झाकणे खोलण्यात आली. याकडे बिबवेवाडी क्षेत्रीय कार्यालय दुर्लक्ष करीत असून, माणसांचे जीव गेल्यावर क्षेत्रीय अधिकारी डोळे उघडणार का? असा सवाल माजी नगरसेवक प्रवीण चोरबेले यांनी बिबवेवाडी क्षेत्रीय कार्यालयाच्या सहायक महापालिका आयुक्त प्रदीप आव्हाड यांनी विचारला आहे. येत्या दोन दिवसांत पावसाळी वाहिन्या दुरुस्त करून चेंबरची झाकणे न लावल्यास क्षेत्रीय कार्यालयात ठिय्या आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.

मार्केट यार्ड परिसरात आठ ते दहा ठिकाणी मुख्य रस्त्यावर चेंबरची झाकणे गायब झाली आहेत. काही झाकणे तुटली आहेत. यार्डात मोठ्या प्रमाणात जड वाहनांची वर्दळ असून, अपघाताची स्थिती निर्माण झाली आहे. अवकाळीमुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी येते, काही ठिकाणी चेंबर खराब होऊन खोल खड्डे निर्माण झाले आहेत. परिणामी, पादचारी आणि दुचाकीधारकांचे अपघात वाढत आहेत. स्थानिक व्यापारी व नागरिकांनी याबाबत तक्रारीसुद्धा केल्या आहेत. पण, प्रशासनाकडून याची दखल घेतली जात नाही, असे स्थानिक नागरिक व व्यापारी सांगत आहेत.

मार्केट यार्ड परिसरात तातडीने कल्व्हर्ट टाकण्याबाबत मुख्य खात्यास कळविण्यात येईल. लवकरात लवकर पावसाळापूर्वी साफसफाईची कामे मार्गी लावली जातील.

– प्रदीप आव्हाड, सहायक आयुक्त, बिबवेवाडी कार्यालय

हेही वाचा

Back to top button