Mahashivratri 2024 : बीड शहरातील महादेवाची बारा प्राचीन मंदिरे | पुढारी

Mahashivratri 2024 : बीड शहरातील महादेवाची बारा प्राचीन मंदिरे

बालाजी तोंडे

बीड : शहर आणि जिल्ह्याला धार्मिक इतिहासाचा मोठा ठेवा लाभलेला आहे. कधीकाळी चंपावतीनगर म्हणून प्रसिध्द असलेल्या बीड शहर व परिसरात कंकालेश्‍वर, सोमेश्‍वर, पापणेश्‍वर, निळकंठेश्‍वर अशी बारा प्राचीन मंदिरे आहेत. यातील काही मंदिरे कालओघात दुर्लक्षित झाली असली तरी ज्यांना ज्योर्तिलिंगाचे दर्शन करणे शक्य होत नाही, असे सामान्य भाविक याच प्राचीन बारा शिवमंदिरांचे दर्शन घेऊन त्यांची उपासना करतात.

बीडची जिल्ह्याची ओळख ऊसतोड मजुरांचा जिल्हा अशी असली तरी एकेकाळी हा साधु- संत आणि अध्यात्मिक विचारांना प्रमाण मानणारा जिल्हा अशी जिल्ह्याची ओळख होती. विशेष म्हणजे, बीड जिल्हा तसेच जिल्ह्यातील अनेक धार्मिक स्थळे, मंदिरेही प्राचीन व मध्ययुगीन काळातील बीडचे महत्व विशद करतात. प्राचीन काळात बीडचे नाव चंपावतीनगर असे होते. चंपावती नावाच्या राणीच्या नावामुळे हे नाव देण्यात आले असल्याचे इतिहासकार सांगतात.

बीड शहर आणि जिल्हा शिवालयांनी गजबजलेला आहे. जिल्ह्यातील ज्या परिसरात आपण जाऊ, तेथून पाच- दहा किलोमीटर अंतरावर प्राचीन शिवालय आहे. ही सारी प्राचीन शिवालये पाहिल्यानंतर एकेकाळी बीड जिल्हा शिवभक्त होता की काय? असा प्रश्‍न पडतो. बारा जोर्तिलिंगांपैकी एक असलेले पाचवे अन् महत्वाचे जोर्तिलिंग परळी वैजनाथ हे आहे. परळी परिसरात वैजनाथ जोर्तिलिंगासोबत इतर अनेक शिवालये आहेत. जिरेवाडी येथे सोमेश्‍वर, धर्मापुरी येथे मरळसिध्द, नागापुर येथे नागनाथ मंदिर, तपोवण येथे रामनाथ महादेव मंदिर तसेच परळी शहरातच वैजनाथ मंदिराच्या पुर्व द्वारासमोर प्रति वैजनाथ हे पुरातन शिवलिंग आहे. ज्यांना टेकडीवजावैजनाथ मंदिर परिसरात जाऊन शारीरिक आरोग्याच्या कारणामुळे दर्शन घेता येत नाही, ते भाविक सुर्वेश्‍वर नगर भागात असलेल्या पुरातन सुर्वेश्‍वर मंदीर या शिवालयात जावून दर्शन घेतात.

बीडमध्येच घडते 12 ज्योर्तिलिंगाचे दर्शन

पुर्वीचे चंपावतीनगर आणि आजचे बीड येथे तर शहराला शिवालयांचा वेढा आहे. यात देशात प्रसिध्द असे जलमंदिर असलेले शिवालय कंकालेश्‍वर, पापणेश्‍वर- तेलगाव नाका, लोहकरेश्‍वर- जुना बाजार, पुत्रेश्‍वर- सराफा गल्ली परिसर, निलकंठेश्‍वर- मोमीनपुरा, सोमेश्‍वर- बार्शी रोड बीड, कलींदेश्‍वर फुलाईनगर, बोबडेश्‍वर- बोबडेगल्ली, रामेश्‍वर- काकूमळा, जटाशंकर जटाशंकर गल्ली, उत्तरेश्‍वर, बेलेश्‍वर अशी बारा जोर्तिलिंगे आहेत. ही सर्व शिवालये पुरातन आणि मध्ययुगीन काळातील आहेत. ज्या भाविकांची १२ जोर्तिलिंग करण्याची इच्छा आहे, परंतु ते करू शकत नाही. असे वृध्द, अजारी अथवा सामान्य कुटुंबातील भाविक कंकालेश्‍वर ते बेलेश्‍वर या शिवालयात जाऊन १२  जोर्तिलिंगाचे दर्शन केल्याची अनुभूती घेतात.

हेही वाचा :

 

Back to top button