Maha Shivratri 2024: हर हर महादेवाचा गजर महाशिवरात्रीच्या पर्वावर होणार लाखो भाविकांची गर्दी, तिर्थस्थळे फुलली | पुढारी

Maha Shivratri 2024: हर हर महादेवाचा गजर महाशिवरात्रीच्या पर्वावर होणार लाखो भाविकांची गर्दी, तिर्थस्थळे फुलली

भंडारा;पुढारी वृत्तसेवा: हर बोला हर…हर…महादेवाच्या गजरात आज जिल्ह्यातील विविध धार्मिक स्थळे भाविकांच्या गर्दीने फुलणार आहेत. सर्वस्थळी महाशिवरात्रीनिमीत्त पूजाअर्चनेची जय्यत तयारी करण्यात आली आहे. भाविकांसाठी एसटी महामंडळाने जादा बसेसचीही सोय केली आहे. भंडारा जिल्ह्यातील प्रसिद्ध बहिरंगेश्वर मंदिर, गायमुख, आंभोरा, लाखा पाटील, झिरी पहाडी, कोरंभी, लाखांदूर शहरातील चुलबंद तिरावर, तुमसर तालुक्यातील देवसराड, बपेरा संगम आदी ठिकाणी महाशिवरात्रीनिमीत्त यात्रेचे आयोजन केले जाते. (Maha Shivratri 2024)

Maha Shivratri 2024: सातपुडा पर्वत रांगेतील ‘गायमुख’ प्रसिद्ध तीर्थक्षेत्र

भंडाराची ग्रामदेवता असलेल्या प्रसिद्ध बहिरंगेश्वर मंदिरात लाखो भाविक पहाटेपासून दर्शनासाठी येतात. शिवलिंगाची भक्तीभावाने पूजा करतात. याठिकाणी सामाजिक संस्थांकडून महाप्रसादाचे आयोजन केले जाते. सातपुडा पर्वत रांगेत निसर्गाच्या सानिध्यात असलेले गायमुख हे प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आहे. या यात्रेत विदर्भासह मध्यप्रदेश, छत्तीसगढ राज्यातून लाखोंच्या संख्येने भाविक येत असतात. गेल्या महिन्याभरापासून याठिकाणी यात्रेची तयारी सुरू आहे. (Maha Shivratri 2024)

नद्याच्या संगमावर असणारे ‘जय भोले देवस्थान’

दोन नद्याचे संगम असणाऱ्या बपेरा येथील जय भोले देवस्थानात दरवर्षी महाशिवरात्रीनिमित्त तीन दिवसीय यात्रेचे आयोजन देवस्थानच्या वतीने करण्यात येते. याच ठिकाणी वैनगंगा आणि बावनथडी या दोन नद्यांचा संगम झाला आहे. दोन नद्यांच्या संगम ठिकाणी नदीच्या पात्रात येत गायखुरी देवस्थान आहे. नदीपात्रातील दगडावर गाईच्या खुरी कोरलेल्या आहेत. जुन्या काळापासून नदीच्या पात्रात यात्रेचे आयोजन करण्यात येते. परंतु नंतर कवलेवाडा धरणात पाणी अडविण्यात आल्याने १८ किमी अंतरापर्यंत पाणीच पाणी आहे. या देवस्थानात गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यातील भाविक एकत्रितपणे यात्रा उत्सवाचे आयोजन करीत होते. नदीच्या पात्रात पाणी अडविण्यात आल्याने यात्रा उत्सव विभागले गेले आहे. दुसºया टोकावरील चांदोरी (गोंदिया) आणि बपेरा (भंडारा) अशा दोन्ही टोकावर महाशिवरात्रीनिमित्त एकाचवेळी यात्रेचे आयोजन करण्यात येते. (Maha Shivratri 2024)

तिर्थक्षेत्र देवसराड (धुटेरा); महाराष्ट्रासह मध्यप्रदेशातील भाविकांचे श्रद्धास्थान

लाखांदूर येथे भगवान शंकर देवस्थान मंदिर, चुलबंद नदीतिरावर यात्रेचे आयोजन केले जाते. लाखोच्या संख्येने भाविक भक्त शिवशंकराच्या दर्शनाला येतात. मागील वर्षी या ठिकाणी ११० फूट हनुमान मूर्तीचे भूमिपूजन करण्यात आले. आज हे शिवतिर्थ लाखो भाविकांचे श्रद्धास्थान बनलेले आहे.  सातपुडा पर्वतरांगेच्या कुशीत वसलेल्या तिर्थक्षेत्र देवसराड (धुटेरा) येथे मध्यप्रदेश तसेच महाराष्ट्रातील भाविकांची गर्दी उसळणार आहे. देवसराड या तिर्थस्थळी शिवभक्त ज्याप्रमाणे छोटा महादेव गायमुख येथे पोहा घेवून जातात, त्याचप्रमाणे लगतच्या मध्यप्रदेशातून व परिसरातून भाविक पोहा घेवून नवस फेडण्याकरिता येतात. तिर्थक्षेत्र देवसराड धुटेरा येथे निसर्गरम्य सातपुडा रांगेतील पर्वतावर मोठमोठ्या दगडांच्या गुफा आहेत. पर्वताच्या अगदी वरच्या दगडाच्या टोकावर शिवपिंड तसेच नंदीबैलाची मूर्ती आहे. या ठिकाणी भाविकांची वाढलेली श्रद्धा व येथे फेडलेले नवस पूर्ण होत असल्यामुळे भाविकांची गर्दी वाढतच आहे. (Maha Shivratri 2024)

हेही वाचा:

 

Back to top button