

ठाणे : ठाणे जिल्ह्याच्या अंबरनाथमधील प्राचीन शिवमंदिर परिसरात महाशिवरात्रीनिमित्त मोठी जत्रा भरते. या जत्रेमध्ये व मंदिरातील महादेवाच्या पिंडीचे दर्शन घेण्यासाठी लाखो भाविक येथे येतात. अंबरनाथचे प्राचीन शिवमंदिर हे महाराष्ट्रातील भूमीज शैलीचे सर्वात प्राचीन शिवमंदिर आहे. शिलाहार राज घराण्यातील माम्वाणी राजाच्या काळात इ.स. १०६० मध्ये हे मंदिर पूर्ण झाल्याचा उल्लेख मंदिरावरील शिलालेखावर आढळतो. Mahashivratri 2024
उत्तर कोकणावर राज्य करणाऱ्या शिलाहार घराण्यातील छित्तराज राजाने १०२२ ते ३५ या काळात हे शिवालय उभारण्यास प्रारंभ केला. आणि इ.स. १०६० मध्ये छित्तराजाच्या धाकट्या भावाच्या मुम्वाणी राजाच्या राज्यकाळात या मंदिराचे बांधकाम पूर्ण झाले. हे मंदिर संपूर्णतः शिल्पजडित आहे. अंतराल, सभामंडप, मंडपातील स्तंभ, मंदिराची सर्व अंगोपंगे यावर विविध देवदेवतांचे अनोखे अस्तित्व मुर्तीरूपात आहे. असे असले तरी आजही या मंदिराचे व्यवस्थापन येथील पारंपरिक पाटील, कोळी समाजाच्या कुटुंबांकडेच आहे. त्यामुळे या मंदिरामध्ये कोणत्याही ट्रस्टची स्थापना झालेली नसल्याने मंदिरात भक्तांच्या रूपाने जमा होणारी देणगीचे आर्थिक व्यवस्थापन देखील पाटील कुटुंबीय सांभाळतात. Mahashivratri 2024
हे मंदिर पुरातत्व विभागाच्या अखत्यारित असल्याने मंदिर आणि परिसरात कोणतेही काम करताना या विभागाची परवानगी घ्यावी लागते. सध्या या मंदिराच्या बाह्य पाषाणातील मूर्तींची पडझड होऊ लागल्याने त्याचे जतन व जीर्णोद्धार करण्यासाठी पुरातत्व विभागाचे अधीक्षक शुभ मजुमदार यांच्या देखरेखीखाली विज्ञान आणि रसायन विभागाच्या तज्ज्ञांकडून कामाचा शुभारंभ नुकताच करण्यात आला आहे.
तब्बल ९६४ वर्षे जुने असलेल्या प्राचीन शिवमंदिर परिसराचे सुशोभिकरण करण्यासाठी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या पुढाकाराने राज्य शासनाने १५० कोटींचा निधी मंजूर केला आहे. नुकतेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शुभहस्ते सुशोभिकारणाचे भूमिपूजन करण्यात आले. मंदिराच्या परिसराचा उज्जैनच्या महाकाल कॉरिडॉरच्या धर्तीवर विकास करण्यात येणार आहे. त्यामुळे भविष्यात या मंदिराची महती जगभर पसरेल, अशी अपेक्षाही व्यक्त होत आहे.
हेही वाचा