Parbhani News : अखेर त्या ६२ कोटींच्या रस्ते कामांना मंजुरी | पुढारी

Parbhani News : अखेर त्या ६२ कोटींच्या रस्ते कामांना मंजुरी

परभणी, पुढारी वृत्तसेवा : महापालिकेने सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वर्ग केलेल्या सहा पैकी चार रस्त्यांच्या कामासाठी  सार्वजनिक बांधकाम विभागाने 62 कोटी रूपयांची मंजुरी दिली. त्यामुळे गेल्या दीड वर्षापासून राजकीय स्थित्यंतरात व कुरघोडीच्या राजकारणात अडकलेल्या त्या रस्त्यांचे भाग्य आता उजळणार आहे. बांधकाम विभागाने बुधवारी (दि.17) याबाबत मंजुरीचे आदेश काढले. त्यामुळे येत्या एक ते दोन दिवसांत वर्कऑर्डर होवून आचारसंहितेपूर्वी या कामांना सुरूवात होईल, अशी माहिती आ.सुरेश वरपुडकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. Parbhani News

महापालिकेची आर्थिक स्थिती अत्यंत कोलमडलेली असल्याने शहरातील रस्त्यांची दुरूस्ती देखील पालिकेकडून होत नव्हती. या पार्श्‍वभूमीवर राज्य शासनाकडून निधी मिळविण्याच्या दृष्टीने महापालिकेच्या तत्कालीन पदाधिकार्‍यांनी आ.वरपुडकर यांच्या नेतृत्वाखाली ठराव घेत शहरातील प्रमुख सहा रस्ते सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वर्ग करण्याचा ठराव घेवून यासाठी निधीचा प्रस्ताव शासनाकडे पाठविला होता. तत्कालीन बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांनी निधीची मंजुरी देत भूमिपूजनाचे सोहळेही पूर्ण केले होते. मात्र, राज्यातील राजकीय स्थित्यंतरामध्ये व स्थानिक पातळीवरील राजकारणातून या रस्त्यांचा निधी रखडला गेला. न्यायालयीन प्रक्रियेतही हा विषय अडकला होता. मात्र, शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था व त्यावर जनसामान्यांच्या झालेल्या तीव्र भावना लक्षात घेत नागरिकांसह काही पदाधिकार्‍यांनी याविषयावर सातत्याने आंदोलने केली होती. सर्वच पक्षाच्या पदाधिकार्‍यांचा यात समावेश होता. तर काँगेसच्या पालिकेतील तत्कालीन पदाधिकार्‍यांनीही राज्य शासनाकडे पाठपुरावा केल्यानंतर या रस्त्यांसाठी निधीची तरतूद झाली आहे. Parbhani News

यासंदर्भात आ.वरपुडकर यांनी रस्त्यांच्या दुरवस्थेचा प्रश्‍न मार्गी लावण्यासाठी पाठपुरावा केला. सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांनी 30 कोटींपेक्षा जास्त व 250 कोटींपेक्षा कमी निविदा स्विकृतीचा निर्णय घेत शहरातील चारही रस्त्यांना मंजुरी दिली. यासाठी 59 कोटी 17 लाख रूपयांच्या निविदा किंमतीवर कंत्राटदाराने 62 कोटी 9 लाख 81 हजारात या कामास होकार दिल्याने शासनाने ती रक्‍कम मंजूर केली आहे. अहमदाबादची सर्जन इंन्फ्राकॉन ही कंपनी काम करणार असून याच कंपनीने गंगाखेड रस्त्याचेही काम पूर्ण केलेले आहे, असेही आ.वरपुडकर यांनी सांगितले.

पत्रकार परिषदेस माजी उपमहापौर भगवान वाघमारे, रवी सोनकांबळे, बाळासाहेब देशमुख, नदीम इनामदार, सुनिल देशमुख, विनोद कदम, सचीन अंबिलवादे, अमोल जाधव, बबलू टाक, पंजाबराव देशमुख, सुहास पंडीत आदी काँगे्रस पदाधिकारी उपस्थित होते.

Parbhani News : या रस्त्यांचा समावेश

जिल्हा सामान्य रूग्णालय ते पारवा-जांब-आनंद-भोगाव, अनुसया टॉकीज ते रेल्वे क्रांसिंगपर्यंत, जायकवाडी कॅनॉल ते खंडोबा बाजार रस्ता व सर्वाधिक दुरावस्था झालेला पाथरी रोडवरील गायकवाड मळा-जुना पेडगाव रस्ता-महाराणा प्रताप चौक-जेल कॉर्नर-नानलपेठ-धाररोड-मरीआई मंदिर ते सुपर मार्केट-देशमुख हॉटेल-कारेगाव रोड-उघडा महादेव मंदिर ते वसमत रोड अशा प्रमुख रस्त्यांचा समावेश असून मजबुतीकरणासह डांबरीकरण, नुतनीकरण करणे, रस्ता दुभाजकासह चार पदरी रस्ता त्याचबरोबर नाल्या, पथदिवे व वृक्षारोपणाची कामे केली जाणार आहेत.

श्रेय लाटण्याचा प्रयत्न

महापालिकेतील पदाधिकार्‍यांनी या रस्त्यांसाठी ते वर्ग करण्याबरोबरच निधीची उपलब्धता करणे, भूमिपूजन करणे यासह रखडलेल्या निधीसाठी सातत्याने शासन दरबारी प्रयत्न केले आहेत. सत्‍ता बदलल्यानंतरही या पदाधिकार्‍यांचे प्रयत्न व जनसामान्यांच्या संतप्‍त भावना लक्षात घेवूनच शासनाने या निधीची मंजूरी दिली आहे. मात्र, निधीच्या श्रेयवादासाठी अनेकांकडून प्रयत्न केले गेले. काहींनी हा निधी इतरत्र वर्ग करण्याचाही प्रयत्न केला. काहींची आंदोलनेही निधी मंजूर होणार हे समजल्यावरच सुरू झाली असा टोला लगावताना या संदर्भात नुकतेच बांधकाम विभागाला टाळे ठोकण्याचा प्रकारही यातूनच केला गेल्याचे आ.वरपुडकर यांनी नमुद करताना अप्रत्यरित्या आ.डॉ.राहूल पाटील व अन्य काही राजकीय मंडळींवर श्रेयवादाच्या लढाईवरून निशाना साधला.

Back to top button