मृगाचा कोल्‍हा, चित्राची म्‍हैस यंदा शेतकऱ्यांना तारणार का?; पंचांगकर्त्यांचा समाधानकारक पावसाचा अंदाज | पुढारी

मृगाचा कोल्‍हा, चित्राची म्‍हैस यंदा शेतकऱ्यांना तारणार का?; पंचांगकर्त्यांचा समाधानकारक पावसाचा अंदाज

भोकरदन, पुढारी वृत्तसेवा आज जग हायटेक झाले असले, तरी मृगाचा अंदाज काढण्यासाठी शेतकरी पंचांगाचा आधार घेतात. याच अंदाजावर शेतकरी नेहमी विश्वास ठेवून पेरणी करतो. खरीप हंगामात त्या-त्या नक्षत्राचे वाहन शेतकऱ्यांच्या जीवनाचे सुख-दुःखाचे चक्र सुरू ठेवते, असा समज आहे.

कोणत्या नक्षत्रात किती पाऊस पडणार, या विषयी पंचांगकर्त्यांनी मांडलेले अंदाज अनेकदा उधळले जातात. परिणामी पेरणी व मशागतीची वाताहतही होते. तर कधी अल्प पावसामुळे शेतकऱ्यांच्या डोळ्यांत पाणी येण्याची वेळ येते. मागील वर्षी जूनमध्ये समाधानकारक पाऊस झाला. तर, सोयाबीन पीक घरात येत असताना झालेल्या अधिक पावसामुळे सोयाबीनचे नुकसान झाले.

या वर्षी पाऊस न झाल्यास नदीचे पात्र, तलवाचे पात्र व विहिरी कोरड्या पडणार आहेत. यामुळे पिके पूर्णपणे करपून जाऊन, शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होणार आहे. तसेच पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होणार आहे. यंदा मृग नक्षत्र कोल्हा या वाहनापासून तर चित्राच्या म्हैस या वाहनापर्यंत समाधानकारक पावसाचा अंदाज पंचांगकर्त्यांनी व्यक्त केला आहे. त्‍यामुळे शेतकऱ्यांना भरघोस उत्पन्नाची आशा पल्लवित झाली आहे. मागील दोन वर्षांमध्ये अनेकदा पावसाने खरीप हंगामात दगा दिला. खरीप हंगामात समाधानकारक पाऊस होणारा असल्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला असून, शेतकऱ्यांनी जमिनीची मशागत केली आहे.

४० टक्के शेतकरी सावकारांच्या दारी

मागच्या वर्षी सोयाबीन पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. अवकाळी पाऊस व दुष्काळी नुकसान झाल्यामुळे भरपाई म्हणून शासनाने या शेतकऱ्यांना मदत दिली. परंतु, मदतीचा धनादेश बँकेतील खात्यात जमा होताच कर्ज कपात करण्यात आली.
त्यामुळे या खरीप हंगामाच्या तोंडावर जिल्ह्यातील ४० टक्के शेतकऱ्यांनी आतापासूनच सावकारांच्या घराचे उंबरठे झिजवायला सुरुवात केली आहे.

हेही वाचा : 

Back to top button