किल्ले रायगडावरील पायरी मार्ग २३ व २४ मे रोजी राहणार बंद!
रायगड ; पुढारी वृत्तसेवा मागील वर्षी किल्ले रायगडावरील 350 व्या राज्याभिषेक सोहळ्यापूर्वी पायरी मार्गाने जाणाऱ्या एका पर्यटक शिवभक्ताचा दरड कोसळल्याने मृत्यू झाला होता. या पार्श्वभूमीवर रायगडचे जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी येत्या 23 व 24 मे रोजी या मार्गावरील महादरवाजा व परिसरातील मोकळे झालेले दगड प्रशिक्षित रॅपलर्सच्या मदतीने दूर काढण्याचा निर्णय घेतल्याची माहिती दिली. तसेच या दोन दिवशी हा पायरी मार्ग बंद राहणार असल्याचे सूचित केले आहे.
गेल्या वर्षी राज्याभिषेक सोहळ्यापूर्वी झालेल्या दुर्घटनेमध्ये एका व्यक्तीचा मृत्यू झाला होता. त्यानंतर किल्ले रायगड पायरी मार्गावरील अनेक ठिकाणी उंच कड्यानजीक असलेल्या मोकळ्या दगडांमुळे भविष्यात अशा पद्धतीची दुर्घटना घडू नये या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी तातडीने झालेल्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला. या निर्णयास दुर्गवीर प्रतिष्ठान मुंबई यांनी सहमती दर्शवली आहे.
यामुळे किल्ले रायगडावरील पायरी मार्ग दिनांक 23 व 24 या दोन दिवशी बंद राहणार असून, संभाव्य दरड आपत्ती सौम्यकरण उपाययोजनेद्वारे या मार्गावरील मोकळे दगड प्रशिक्षित रॅपलर्सच्या मदतीने काढण्यात येणार असल्याचे या पत्राद्वारे सूचित करण्यात आले आहे. या मार्गावर परिसरातील नागरिक, शिवभक्त पर्यटक व कोणीही दोन दिवस प्रवास करू नये असे आवाहन जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.
हेही वाचा :