हिंगोली: जवळा बुद्रुक शिवारात कापूस पिकात लावलेली गांजाची झाडे जप्त | पुढारी

हिंगोली: जवळा बुद्रुक शिवारात कापूस पिकात लावलेली गांजाची झाडे जप्त

हट्टा, पुढारी वृत्तसेवा : वसमत तालुक्यातील जवळा बुद्रूक येथे एका शेतातून कापसाच्या पिकात लावलेली गांजाची झाडे हट्टा पोलिसांच्या पथकाने मंगळवारी दुपारी जप्त केली. सुमारे साडेचार किलो वजन असलेल्या या गांजाची किंमत सुमारे 75 हजार रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणी एका व्यक्तीस ताब्यात घेण्यात आले आहे.

वसमत तालुक्यातील जवळा बुद्रूक शिवारातील एका शेतात कापसाच्या पिकात गांजाची झाडे लावण्यात आल्याची माहिती हट्टा पोलिसांना मिळाली होती. त्यावरून पोलिस अधिक्षक जी. श्रीधर, अप्पर पोलिस अधिक्षक अर्चना पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हट्टा पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक गजानन बोराटे, उपनिरीक्षक सतीष तावडे, जमादार बालाजी जाधव, गणेश सुर्यवंशी, आसेफ शेख, मारोती गडगिळे, महेश अवचार इक्बाल शेख यांच्या पथकाने आज दुपारपासून जवळा बुद्रूक शिवारात शोध मोहिम हाती घेतली होती.

त्यानंतर दुपारी चार वाजण्याच्या सुमारास गजानन बाजीराव डाढाळे या शेतकऱ्याच्या शेतात कापसाच्या पिकात पाहणी केली असता त्या ठिकाणी गांजाची झाडे आढळून आली. पोलिसांनी त्या ठिकाणी असलेली झाडे उपटून जप्त केली. या झाडांचे वजन साडेचार किलो असून त्याची किंमत सुमारे ७५ हजार रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणी हट्टा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून सहाय्यक पोलिस निरीक्षक बोराटे पुढील तपास करीत आहेत.

हेही वाचा 

Back to top button