हिंगोली: मोरवाडी शिवारात जुगार अड्ड्यावर छापा; ८ लाखांचा मुद्देमाल जप्त | पुढारी

हिंगोली: मोरवाडी शिवारात जुगार अड्ड्यावर छापा; ८ लाखांचा मुद्देमाल जप्त

हिंगोली, पुढारी वृत्तसेवा : कळमनुरी तालुक्यातील मोरवाडी शिवारात पोलिसांच्या विशेष पथकाने मंगळवारी सायंकाळी छापा टाकून 8.54 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. यामध्ये 10 दुचाकी, पाच मोबाईल तसेच रोख 1.57 लाख रुपयांचा समावेश आहे. या प्रकरणी कळमनुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कळमनुरी तालुक्यातील मोरवाडी शिवारात काही जण झन्नामन्ना नावाचा जुगार खेळत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यावरून पोलीस अधीक्षक जी. श्रीधर, अप्पर पोलीस अधिक्षक अर्चना पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हिंगोली शहर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव मांजरमकर, विशेष पथकातील उपनिरीक्षक माधव जिव्हारे, जमादार अमित जाधव, विनोद दळवी, शेख मोहसीन, संभाजी लकुळे, गणेश लेकुळे, धनंजय क्षिरसागर, पठण यांच्या पथकाने मंगळवारी सायंकाळी मोरवाडी शिवारात जाऊन छापा टाकला.

पोलिसांना पाहताच जुगार खेळणाऱ्या व्यक्ती पळून जाऊ लागल्या. अनेकांनी दुचाकी वाहने घटनास्थळावरच सोडून दिली. पोलीस अन जुगाऱ्यांच्या पळापळीच्या खेळात पोलिसांनी चौघांना ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी घटनास्थळावरून 1.57 लाख रुपये रोख जप्त केले. या शिवाय जुगाऱ्यांची 10 दुचाकी वाहने तसेच 5 मोबाईल जप्त केली आहेत. पोलिसांनी सर्व मुद्देमाल जप्त करून कळमनुरी पोलीस ठाण्यात आणला. तसेच ताब्यात घेतलेल्या चौघांना कळमनुरी पोलीस ठाण्यात आणून उर्वरीत जुगाऱ्यांची माहिती घेतली जात होती.

या प्रकरणी जमादार अमित जाधव यांच्या तक्रारीवरून संदीप नामदेव मोरे (रा. मोरवाडी), शेख अमजद शेख रहेमत, किशोर नारायण भालेराव, गोविंद केशवराव गाभणे (सर्व रा. कळमनुरी) यांच्या विरुध्द कळमनुरीत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

हेही वाचा 

Back to top button