

आखाडा बाळापूर : कळमनुरी तालुक्यातील नागपूर – नांदेड महामार्गावर वारंगा फाटा येथून काही अंतरावर रस्त्यालगत श्री भवानी मातेचे मंदिर आहे. या मंदिरात आज (दि.१५) पासून नवरात्रोत्सवाला सुरूवात झाली आहे. घटस्थापनेपासून देवीची आरती सकाळी साडेआठ वाजता व सायंकाळी सात वाजता केली जाते. रात्री भजन, कीर्तन, गोंधळ असे कार्यक्रम नवरात्रीमध्ये आयोजित केले आहेत.
आश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षातील प्रतिपदा तिथी पासून नवरात्रीची सुरुवात होती आणि नवमीला सप्ताह होते. नवरात्र महोत्सवामध्ये देवीची महापूजा रंगनिहाय नवीन वस्त्रे परिधान करून नित्यनेमाने केली जाते. सकाळी आठ वाजता महाआरती सुरू होते. या आरतीचा लाभ घेण्यासाठी आखाडा बाळापूर वारंगा डोंगरकडा अर्धापूर चुंचा चिखली फुटाणा तोंडापूर दाती कुडतडी आदी ठिकाणाहून भक्त मंडळी पायी चालत येतात. नांदेड, परभणी, हिंगोली, लातूर, अकोला, यवतमाळ जिल्ह्यामध्ये नवसाला पावणारी भवानी माता वारंगा फाटा अशी देवीची ओळख आहे. नवरात्रीमध्ये भाविक मोठ्या संख्येने देवीच्या दर्शन आणि नवस बोलण्यासाठी येतात.
सकाळी ११ नंतर ओटी भरणे दिवसभर सुरू असते. नवरात्र महोत्सवामध्ये विजयादशमीच्या दिवशी दसऱ्याच्या मुहूर्तावर मंगळवारी (दि.२४) महाप्रसादाचे आयोजन केले आहे. महाप्रसाद घेण्यासाठी जिल्ह्यासह बाहेर जिल्ह्यातून हजारोंच्या संख्येवर भाविक भक्त येत असतात. तरी भाविक भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
हेही वाचा