लातूरच्या सृष्टी जगतापने रचला विश्वविक्रम; सलग १२७ तास नृत्य, गिनीज बुकात नोंद | पुढारी

लातूरच्या सृष्टी जगतापने रचला विश्वविक्रम; सलग १२७ तास नृत्य, गिनीज बुकात नोंद

लातूर; पुढारी वृतसेवा : लातूरच्या सृष्टी सुधीर जगतापने (वय१६) सलग १२७ तास नृत्य सादर करीत विश्वविक्रम केला. यापूर्वी हा विक्रम नेपाळ येथील बंदना नेपाळ या नृत्यांगनेच्या नावावर होता. हा विक्रम मोडत शनिवारी (दि.३) त्यावर आपल्या नावाची मोहर उमटवली. तिच्या या विक्रमाची नोंद गिनीज बुक ऑफ वल्ड रेकॉर्डने घेतली आहे.

सोमवारी (दि.२९) सकाळी सहा वाजेपासून सृष्टीने या विक्रमासाठी येथील दयानंद सभागृहात नृत्याविष्कारास सुरुवात केली. तिला प्रोत्साहन देण्यासाठी व तिचे मनोबल वाढविण्यासाठी लातूरचे लोकप्रतिनिधी, अधिकारी, विविध क्षेत्रातील मान्यवर नागरिक, विद्यार्थी सभागृहात उपस्थित होते.

सृष्टी ही दयानंद महाविद्यालयाची विद्यार्थीनी असल्याने संस्थेने तिच्या या नृत्याविष्कारासाठी सभागृह मोफत उपलब्ध करुन दिले होते. बुधवारी तिने या नियोजित विक्रमाचा अर्धा टप्पा लिलया पार केला होता. शनिवारी (दि.३) तिने त्यावर आपले नाव कोरले.

आहार व विश्रांती

सृष्टीला प्रत्येक तासाला पाच मिनिटाचा ब्रेक घेण्याची मुभा गिनीज बुकने दिली होती. तथापि ती तशी न घेता चार तासानंतर एकत्रीतपणे पंधरा ते वीस मिनीटाचा ब्रेक ती घेत होती. भाकरी डाळ व फळांचा रस, सुप, पाणी असा तिचा आहार होता.

या नृत्याविष्कारासाठी १५ हजार विविध गितांचे सलग रॅकार्डींग तिने वापरले होते व त्यावर ती सलग सहा दिवस आणि पाच रात्र तब्बल १२७ तास नृत्य करीत होती. कॅमेऱ्यांची नजर तिच्यावर होती. या दरम्यान कसलाही ताण न घेता तिने उद्दिष्ठ साध्य केले. विशेष म्हणजे असा विक्रम करणारी सृष्टी ही जगातील वयाने लहान असलेली एकमेव मुलगी ठरली आहे.

सृष्टी ही लातुरच्या दयानंद महाविद्यालयाच्या अकरावीची विद्यार्थीनी आहे. ती नृत्य विशारद असून तिला दहावीला ९९ टक्के गुण होते. २०२१ मध्ये सलग २४ तास नृत्य केल्याने तिची नोंद आशिया बुक ऑफ रेकॉर्डने घेतली होती. कल्चरल ऑलम्पियाडसाठी तिने भारताचे प्रतिनिधित्वही केले आहे. सृष्टीचे आई वडील शिक्षक आहेत.

हे आहेत नियम

दर तासाला पाच मिनिटाचा किंवा सलग चार तास करुन वीस मिनिटाचा ब्रेक घेता येतो. यातच तुम्हाला खाणे, पिणे, विश्रांती घेणे, वॉशरुमला जाणे हे अंतर्भूत असते. नियमानुसार दिलेला ब्रेक वगळता दिलेल्या अ‌वधीत तुमच्या पायाची हालचाल सुरू राहीले पाहीजे यात जराशीही गल्लत झाली तर तुम्ही बाद होतात, असे गिनीजचे डांगरीकर यांनी सांगितले.

भारतीय स्वातंत्र्यांच्या अमृत महोत्सव औचित्यावर मी हा विक्रम करु शकले याचा मोठा आनंद आहे. प्रत्येक क्षण कसोटीचा होता परंतु तयारी चांगली झाल्याने यश लाभले.

– सृष्टी जगताप

लॉगेस्ट डान्स मॅरेथॉन बाय अॅन इंडिज्वल या अंतर्गत हा विश्व विक्रम सृष्टीने केला आहे. सुरूवातीपासून मी इथे आहे. मी सर्व चित्रीकरण तपासले आहे. सर्व नियम अन मागदर्शक तत्वांचे पालन करीत सृष्टीने हे यश मिळवले आहे.

– स्वप्निल डांगरीकर, गिनिजचे प्रतिनिधी

 

हेही वाचा; 

Back to top button