२०२४ च्या निवडणुकीत नांदेड, हिंगोली काँग्रेसनेच लढवावी! दोन्ही जिल्ह्यातील नेत्यांची प्रदेश काँग्रेसकडे मागणी | पुढारी

२०२४ च्या निवडणुकीत नांदेड, हिंगोली काँग्रेसनेच लढवावी! दोन्ही जिल्ह्यातील नेत्यांची प्रदेश काँग्रेसकडे मागणी

हिंगोली, पुढारी वृत्तसेवा : नांदेड व हिंगोली हे दोन्ही लोकसभा मतदारसंघ काँग्रेसच्या कोट्यात आहेत. त्यामुळे २०२४ च्या निवडणुकीत ते काँग्रेसकडेच कायम ठेवावेत, अशी जोरदार मागणी दोन्ही जिल्ह्यातील काँग्रेस नेत्यांनी केली आहे.

नांदेड व हिंगोली लोकसभा मतदारसंघात माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण देतील, तो उमेदवार मोठ्या मताधिक्क्याने निवडून आणू, असा विश्वास दोन्ही जिल्ह्यातील पदाधिकार्‍यांनी व्यक्त केला. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आगामी लोकसभा निवडणुकीसाठी या दोन्ही मतदारसंघांची जबाबदारी अशोकराव चव्हाण यांच्याकडे सोपवत असल्याचे बैठकी अंती जाहीर केले. जिल्ह्यात काँग्रेसची संघटनात्मक बांधणी बळकट असून, विधानसभा मतदारसंघ, स्थानिक स्वराज्य संस्था, बाजार समित्या व सहकारी संस्थांवर मजबूत पकड असल्याचे प्रदेश उपाध्यक्ष अमरनाथ राजूरकर यावेळी म्हणाले.

भारत जोडो यात्रेमुळे चांगली वातावरण निर्मिती झाली असून, अशोकराव चव्हाण यांनी पालकमंत्री असताना विकासकामांसाठी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात निधी खेचून आणल्याने मतदार त्यांच्या पाठीशी उभे असल्याचे माजी मंत्री भास्करराव पाटील खतगावकर यांनी सांगितले. जिल्हाध्यक्ष गोविंदराव शिंदे नागेलीकर यांनी नांदेड जिल्ह्यात अशोकराव चव्हाण राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेला (ठाकरे गट) सोबत घेऊन काम करीत असल्याने एकीचे वातावरण असल्याचे सांगितले.

नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष तथा माजी आमदार वसंतराव चव्हाण, आ. माधवराव पाटील जवळगावकर, माजी आमदार अविनाश घाटे, ईश्वरराव भोसीकर आदींनीही या बैठकीत आपली मते मांडली. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने आयोजित केलेल्या लोकसभा मतदारसंघनिहाय बैठकीत ही मागणी करण्यात आली. याप्रसंगी प्रदेशाध्यक्ष आ. नाना पटोले, माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, अशोकराव चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, प्रदेश कार्याध्यक्ष बसवराज पाटील, नसिम खान, आ. प्रणिती शिंदे, आ. कुणाल पाटील, प्रदेश सहप्रभारी संपत कुमार, आशिष दुवा, सोनल पटेल, सेवादलाचे प्रदेश समन्वयक विलास औताडे आदींनी दोन्ही जिल्ह्यातील पदाधिकार्‍यांच्या भावना जाणून घेतल्या.

हिंगोली जिल्ह्यातून जिल्हाध्यक्ष दिलीपराव देसाई देशमुख, आ. प्रज्ञाताई सातव, माजी आमदार भाऊराव पाटील गोरेगावकर, हरिभाऊ शेळके, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव सचिन नाईक आदींनी आपली मते मांडली. हिंगोली लोकसभा मतदारसंघाच्या मागील निवडणुकीत शिवसेनेचा उमेदवार विजयी झाला असला तरी आता त्या पक्षात उभी फूट पडली आहे. आजमितीस जिल्ह्यात काँग्रेस सर्वाधिक बळकट असा राजकीय पक्ष आहे. भारत जोडो यात्रेमुळे जिल्ह्यात सकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर ही जागा काँग्रेसनेच लढवावी, अशी जोरदार मागणी सर्वच नेते व पदाधिकार्‍यांनी केली. या बैठकीला आ. मोहनराव हंबर्डे, आ. जितेश अंतापूरकर, माजी खासदार तुकाराम रेंगे पाटील, माजी आमदार हनुमंतराव पाटील बेटमोगरेकर, ओमप्रकाश पोकर्णा, प्रदेश सचिव अ‍ॅड. सुरेंद्र घोडजकर, अर्चनाताई राठोड, नांदेड कृषी उत्पन्न बाजार समितीचे अध्यक्ष संजय लहानकर, नांदेड शहर जिल्हा महिला काँग्रेसच्या प्रभारी डॉ. वंदनाताई मुरकुटे, डॉ. अंकुश देवसरकर, काँग्रेस मागासवर्गीय विभागाचे जिल्हाध्यक्ष मनोहर पवार, शहराध्यक्ष मंगेश कदम, देगलूरचे काँग्रेस तालुकाध्यक्ष शिवाजीराव बळेगावकर, प्रितम देशमुख, साहेबराव कांबळे, एनएसयुआयचे जिल्हाध्यक्ष शशिकांत क्षीरसागर यांच्यासह अनेक पदाधिकारी व प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.

Back to top button