केज : साळेगांव चोरीतील संशयिताला ठोकल्या बेड्या | पुढारी

केज : साळेगांव चोरीतील संशयिताला ठोकल्या बेड्या

केज : पुढारी वृत्‍तसेवा साळेगांव येथून एकाच रात्रीत चोरीला गेलेल्या आठ विद्युत पाणबुडी मोटारींचा पोलिसांनी अवघ्या ४८ तासात तपास करून सात पाणबुड्या मोटारींसह एकाला ताब्यात घेतले. यामुळे कृषी साहित्य चोरांची टोळी केज पोलिसांच्या हाती लागण्याची शक्यता आहे.

या बाबतची अधिक माहिती अशी की, दि. ४ मे ते ५ मे च्या दरम्यान मध्यरात्री केज तालुक्यातील साळेगाव येथील माळेगाव लवण नावाने ओळखले जात असलेल्या भागातील रुपेश घाटूळे, मच्छिंद्र घाटूळे, मल्हारी गित्ते, नारायण बचुटे, अर्जुन वैरागे या शेतकऱ्यांच्या विहिरीतील आठ पाणीबुडी विद्युत मोटारी अज्ञात चोरट्यानी चोरून नेल्या होत्या. यामुळे या परिसरातील शेतकरी धास्तावले होते.

या प्रकरणी दि. ५ मे रोजी रुपेश घाटूळे यांच्या तक्रारी वरून अज्ञात चोरट्यां विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता आणि त्याचा तपास पोलीस नाईक चंद्रकांत काळकुटे हे करीत होते.

दरम्यान या विद्युत पाणबुडी मोटारींच्या चोरी प्रकरणी सहाय्यक पोलीस अधीक्षक आणि पोलीस निरीक्षक बाळासाहेब पवार यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रगटीकरण शाखेने अत्यंत गोपनीय पद्धतीने माहिती मिळवून चोरीचे कनेक्शन हे शेजारच्या उस्मानाबाद जिल्ह्यात असल्याचे कळताच दि. ७ मे रोजी पोलीस उपनिरीक्षक आनंद शिंदे, गुन्हे प्रगटीकरण शाखेचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक राम यादव, दिलीप गित्ते आणि राजू गुंजाळ व तपासी अंमलदार चंद्रकांत काळकुटे यांनी खाजगी वाहनाने उस्मानाबाद जिल्ह्यातील शिराढोण येथून एका संशयिताला ताब्यात घेतले.

त्याला विश्वासात घेऊन तपास केला असता, ढोकी पासून २५ किमी अंतरावर असलेल्या इरला या गावात विद्युत पंप दुरुस्ती दुकाना समोर संशयित पाणबुड्या मोटारी आढळून आल्या. तसेच त्या नंतर पोलिसांनी एक चोरीच्या गुन्ह्यातील मुद्देमालाची वाहतूक करणारे वाहन आढळून आले. त्या नंतर संशयिताला ताब्यात घेतले. या तपासकामी ढोकी पोलीस ठाण्याचे अंमलदार क्षीरसागर यांनी केजच्या पोलीस पथकाला मदत केली.

शेतातील साहित्य चोरांची टोळी हाती लागण्याची शक्यता :- यातील संशयित आरोपीला न्यायालयाने पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. त्याच्याकडून इतर चोरीचा मुद्देमाल आणि मोठी चोरांची टोळी हाती लागण्याची शक्यता आहे.

हेही वाचा :  

Back to top button