दरवर्षी आग्रा येथे शिवजयंती साजरी करणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा | पुढारी

दरवर्षी आग्रा येथे शिवजयंती साजरी करणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा

आग्रा, सतीश मोरे  : हिंदवी संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती आग्रा येथील किल्ल्यात साजरी करणे हा विलक्षण अनुभव असून आता दरवर्षी आग्रा येथे शिवजयंती साजरी करणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रवीवारी (दि.१९) केली. मुख्यमंत्री शिंदे यांच्या उपस्थितीत आग्रा किल्ला येथे मोठ्या उत्साही वातावरणात छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली.

औरंगाबाद येथील अजिंक्य देवगिरी प्रतिष्ठान आणि आर. आर. पाटील फाउंडेशन यांच्या वतीने आग्रा किल्ल्यात आयोजित करण्यात आलेल्या शिवजयंती उत्सवासाठी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे, केंद्रीय विधी, न्याय राज्यमंत्री एस. पी. सिंग बघेल, राज्यमंत्री कपिल पाटील, महाराष्ट्राचे सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार, शिक्षण मंत्री दीपक केसरकर, औरंगाबादचे पालकमंत्री संदीपान भुमरे, आमदार हरिभाऊ बागडे, संजय शिरसाट, प्रशांत बंब, सतीश चव्हाण आदी मान्यवरांची उपस्थिती होती.

यावेळी शिंदे म्हणाले की, आग्रा किल्ल्यात शिवजयंती साजरी होतेय हा मोठा क्षण आहे. याच किल्ल्यात छत्रपतींचा स्वाभीमान दुखावला होता, येथे शिवजयंती साजरी होणं हा एक प्रकारचा बदला घेण्याची संधी मिळाली असल्याचेही शिंदेच्या यावेळी म्हणाले.

यावेळी प्रास्ताविक करताना विनोद पाटील म्हणाले कि शिवजयंती आग्रा येथेच का असा प्रश्न विचारला गेला मात्र शिवराय हे केवळ कुना एका धर्माचे नव्हते ते नॅशनल हिरो आहेत असल्याचे सांगत त्यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ व कार्यक्रमाला सहयोग करणाऱ्या सर्व मान्यवरांचे आभार मानले. हा तोच दरबार जेथे छत्रपतींचा स्वाभिमान दुखावला होता आज त्याच ठिकाणी जयंती साजरी होत असल्याचे पाटील यांनी सांगितले.

यावेळी रावसाहेब दानवे म्हणाले की, देशात शिवजयंती साजरी करण्यात येते मात्र ज्या ठिकाणी छत्रपतींना कैद करून ठेवले त्याच ठिकाणी जयंती साजरी केली जातेय हे श्रेय विनोद पाटील याना असल्याचे दानवे यांनी सांगितले.

योगी यांचा व्हिडीओ संदेश

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी कार्यक्रमासाठी व्हिडीओ संदेश पाठवला हा संदेश कार्यक्रम प्रसंगी दाखवण्यात आला. देशातील विविध ठिकाणी देशात जयंती मोठ्या उत्साही वातावरणात साजरी करण्यात येत असल्याचे सांगत योगी यांनी शिवजयंतीच्या शुभेच्छा दिल्या.

गर्जा महाराष्ट्र गीत, सॅण्ड आर्ट शो अन पाळणा ..

कार्यक्रम प्रसंगी वैशाली माडे आणि नितीन सरकटे यांनी गर्जा महाराष्ट्र गीत सादर केले यानंतर कलाकारांनी शिवछत्रपती जन्मोत्सवाचा पाळणा सादर केला. यावेळी वाळूपासून छत्रपतींच्या जीवनावर सर्वम पटेल यांनी सॅण्ड आर्ट शो सादर करण्यात आला.

देशाच्या कानाकोपऱ्यातुन शिवप्रेमींची हजेरी

शिवजयंती महोत्सव कार्यक्रमास केवळ महाराष्ट्रातूनच नाही तर देशाच्या कानाकोपऱ्यातून शिवप्रेमींनी हजेरी लावली होती. प्रामुख्याने दिल्ली, हरियाणा, मध्यप्रदेश, कर्नाटक, आंध्रप्रदेश, तेलंगणा, गोवा, राजस्थान या राज्यातून येणाऱ्या शिवप्रेमींची संख्या मोठी होती.
‘आग्रा येथून सुटका’ चे सादरीकरण

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनातील काही प्रसंगांचे यावेळी सादरीकरण करण्यात आले. शंतनु मोघे, गिरिष ओक, महेश कोकाटे यांच्या सह ७० कलावंत भुमिका केली. यामध्ये शिवरायांनी आग्रा येथून सुटका करून घेतल्याचा प्रसंग सादर करण्यात आला. या नाट्यप्रयोगाला उपस्थित प्रेक्षकांनी भरभरून दाद दिली.

किल्ल्याबाहेर हजारो शिवभक्त झाले शिवजयंतीचे साक्षीदार..

शिवजयंती महोत्सवासाठी प्रशासनाने केवळ ४०० शिवप्रेमींना किल्ल्यामध्ये प्रवेश दिला. मात्र या सोहळ्यासाठी आलेल्या सर्वच शिवप्रेमींना किल्ल्यातील कार्यक्रमाला हजेरी लावण्यासाठी परवानगी द्यावी यासाठी पुरातत्व विभाग तसेच पोलीस अधिकाऱ्यांशी किरकोळ हुज्जत झाली मात्र किल्ल्याशेजारी असलेल्या रामलिला मैदानात आयोजकांकडून कार्यक्रमाचे थेट पाहण्यासाठी मोठ्या स्क्रीन लावण्यात आल्या होत्या. याच मैदानावर हजारो शिवप्रेमींनी कार्यक्रमाचा आनंद घेतला.

Back to top button