हिंगोली : शेतकऱ्यांना तातडीने वीज जोडणी द्या अन्यथा आंदोलनाचा इशारा | पुढारी

हिंगोली : शेतकऱ्यांना तातडीने वीज जोडणी द्या अन्यथा आंदोलनाचा इशारा

आखाडा बाळापूर (हिंगोली), पुढारी वृत्तसेवा : शेतकऱ्यांनी पाच ते सहा वर्षांपूर्वी वीज वितरण कंपनीचे पैसे भरून कोटेशन घेतलेले आहे. परंतु अद्याापही विजेची जोडणी करण्यात आली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना आपल्या पिकांना पाणी देण्यासाठी वीज मिळत नाही. शेतातील उभे पिके वाळत आहेत. वीज वितरण कंपनीने तात्‍काळ शेतकऱ्यांना वीज जोडणी द्यावी अन्यथा शिवसेनेच्या वतीने आंदोलन करण्यात येईल, असा इशारा जिल्हा उपसंपर्कप्रमुख गोपू पाटील-सावंत यांनी वीज वितरण कंपनीला दिला.

कळमनुरी तालुक्यातील शेतकऱ्यांनी शेतातील कृषी पंपासाठी वीज जोडणी करता उपविभागीय कार्यालयाकडे पाच ते सहा वर्षांपूर्वी कोटेशनचे पैसे भरले आहेत. परंतु रक्कम भरूनही तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांना अद्यापपर्यंत वीज जोडणी मिळाली नाही. यंदा खरीप हंगाम, लहरी हवामान, अवकाळी पावसामुळे पिकांचे नुकसान झाले आहे.

यामध्ये सोयाबीन, उडीद, मूग, ज्वारी, कापूस पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. तसेच शेतकऱ्यांवर कर्जाचे ओझे असून मुलांचे शिक्षण, मुलींचे लग्न अशा अनेक जबाबदाऱ्या शेतक-यावर आहेत. शेतकऱ्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात असल्याने सध्याची परिस्थिती बिकट आहे. मागील पाच ते सहा वर्षांपासून शेतकऱ्यांनी शेतामध्ये विहीर व बोरवेल खोदण्यात आली आहेत. विहिरीला, बोरवेलला पाणी असून सुद्धा शेतकऱ्यांना पिकांना पाणी देता येत नाही.

वीज वितरण कंपनी त्वरित याची दखल घेऊन सध्या शेतकऱ्यांच्या वीज जोडणी त्वरित करावी अन्यथा शिवसेनेच्या वतीने आंदोलन करण्यात येईल, असा इशारा महावितरण कंपनीला देण्यात आला आहे.

हेही वाचा  

कोल्हापूर : बिद्रीने ‘एफआरपी’ पेक्षा ५०० रुपये जादा दर द्यावा यासाठी शेतकऱ्यांचा रास्ता रोको

बेळगाव अधिवेशन 19 डिसेंबरपासून

बुलढाणा : सावरकरांवरील राहुल गांधींच्या वक्तव्याविरोधात मनसे आक्रमक

Back to top button