बेळगाव अधिवेशन 19 डिसेंबरपासून | पुढारी

बेळगाव अधिवेशन 19 डिसेंबरपासून

बंगळूर; पुढारी वृत्तसेवा : विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन 19 ते 29 डिसेंबरपर्यंत दहा दिवस बेळगावातील सुवर्णसौधमध्ये भरवण्यात येणार आहे. गुरुवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. बैठकीनंतर आरोग्यमंत्री डॉ. के. सुधाकर यांनी निर्णयाची माहिती पत्रकारांना दिली. ते म्हणाले, यंदा कोणत्याही गोंधळाविना अधिवेशन पार पाडण्यात येईल. सकारात्मक चर्चा केली जाईल. अधिवेशनाच्या तयारीसाठी संबंधित अधिकार्‍यांना सूचना देण्यात येईल. याबाबत बैठका घेण्यात येणार असून राज्यातील विविध समस्यांवर उपाययोजना केल्या जातील.

बागलकोट जिल्ह्यातील रबकवी-बनहट्टी तालुक्याच्या कार्यक्षेत्रात नियमित पाणीपुरवठ्यासाठी ससालट्टी शिवलिंगेश्वर उपसा जलसिंचन येाजना जारी करण्यात आली आहे. योजनेच्या दुसर्‍या टप्प्यासाठी 209 कोटी रुपयांचे अनुदान देण्यास मंत्रिमंडळाने मंजुरी दिली. या योजनेमुळे रबकवी-बनहट्टीसह बेळगाव जिल्ह्यातील रायबाग आणि मुडलगी तालुक्यातील एकूण 21 गावांना पाणीपुरवठा केला जाणार आहे. कृष्णा नदीतून पाणी सोडण्यात येणार असून वेळेत योजना पूर्ण करण्याची सूचना देण्यात आल्याचे डॉ. सुधाकर यांनी सांगितले.

रायबाग (जि. बेळगाव) येथील सहा गावे आणि रबकवी-बनहट्टी तालुक्यातील 11 गावे तसेच मुडलगी तालुक्यातील चार गावांना शेतीसाठी पाणीपुरवठा केला जाणार आहे. खरीप हंगामात कृष्णा नदीतून दोनवेळा पाणी सोडण्यात येणार आहे. नदीतील अतिरिक्त पाण्याचा योग्य वापर केल्याने दुष्काळी भागाला वरदान मिळणार आहे. या पाणीपुरवठ्यामुळे अंतर्जल पातळी वाढण्यास मदत मिळणार आहे. परिणामी शेतकर्‍यांची आर्थिक स्थिती सुधारणार असल्याचा दावा आरोग्यमंत्री डॉ. सुधाकर यांनी दिला.

Back to top button