वाशिम: शाळाबंदी विरोधात शाळा बचाव समितीचा एल्गार | पुढारी

वाशिम: शाळाबंदी विरोधात शाळा बचाव समितीचा एल्गार

वाशिम: पुढारी वृत्तसेवा: महाराष्ट्र सरकारने जनतेवर ज्ञानबंदी लादण्यासाठी जिल्हा परिषद शाळा बंद करण्याचा कुटिल डाव आखला आहे. हा डाव उधळून लावण्यासाठी आज (दि.१९) शाळा बचाव समितीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलनाच्या माध्यमातून एल्गार पुकारण्यात आला. यावेळी ‘शाळा आमच्या हक्काची, नाही कुणाच्या बापाची’, ‘सरकारी शाळा बंद करणाऱ्या सरकारचा जाहीर निषेध, ‘शाळा वाचवा, शिक्षण वाचवा’, अशी घोषणा देण्यात आला. शासनाने हा निर्णय मागे घेतला नाही, तर यापुढे तीव्र स्वरुपाचे आंदोलन करण्याचा इशारा आंदोलनकर्त्यांनी यावेळी दिला.

या आंदोलनात सुरकंडी बू., मसला बू., झोडगा बु. एकलासपुर, सरपखेड येथील शाळासह जिल्ह्यातील विद्यार्थी, पालक, शिक्षक व विविध सामाजिक संघटनांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यावेळी आंदोलनकर्त्यांनी मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी यांच्यामार्फत मुख्यमंत्र्यांना पाठविले.

२० पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळा ह्या आदिवासी पाडे दुर्गम भागातील मुला – मुलींच्या शिक्षणासाठी सुरू आहेत. शासनाच्या या निर्णयामुळे या शाळा बंद होतील. तेथील मुले शिक्षणापासून वंचित राहतील. तसेच सध्याची शिक्षक भरती प्रक्रिया ही भ्रष्टाचारास खतपाणी घालणारी आहे. त्यामुळे शिक्षक भरती करताना ती सरसकट केंद्रीय पद्धतीने करण्यात यावी. तसेच सरकारी शाळा मोडकळीस येण्याचे कारण खर्चाची तरतूद कमी करणे हे आहे, त्यामुळे शिक्षणावर सकल उत्पन्नाच्या किमान सहा टक्के खर्च प्रत्यक्ष कृतीतून करावा, आदी मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले. यावेळी शाळा बचाव समितीचे जिल्हा महासचिव पी. एस. खंडारे यांनी गाडगेबाबा यांच्या भूमिकेत प्रबोधन केले. तर शाहीर इंगोले यांनी बहारदार गीतातून प्रबोधन केले.

हेही वाचलंत का ? 

Back to top button