नागपूर : ‘गो-ग्रीन’ वाचविणार वीज ग्राहकांचे पैसे! | पुढारी

नागपूर : ‘गो-ग्रीन’ वाचविणार वीज ग्राहकांचे पैसे!

नागपूर; पुढारी वृत्तसेवा : महावितरणच्या नागपूर प्रादेशिक कार्यालयांतर्गत संपूर्ण विदर्भातील ५७ हजार ८५२ ग्राहकांनी वीजबिलांसाठी छापील कागदाचा वापर पूर्णपणे बंद केला असून केवळ ‘ई-मेल’ व ‘एसएमएस’चा पर्याय निवडून महावितरणच्या पर्यावरणपुरक ‘गो-ग्रीन’ योजनेला प्रतिसाद दिला आहे. या योजनेनुसार छापील वीज बिलाच्या कागदा ऐवजी फक्त ‘ई-मेल’ व ‘एसएमएस’चा पर्याय निवडल्यास वीजग्राहकांना प्रतिबिलात दहा रुपयांची सवलत देण्यात येत आहे. त्यामुळे योजनेत सहभागी ग्राहकांची वीजबिलांमध्ये वार्षिक १२० रुपयांची बचत होणार आहे.

महावितरणच्या संगणकीय प्रणालीद्वारे वीजबिल तयार झाल्यानंतर लगेचच ते ‘गो-ग्रीन’ योजनेतील ग्राहकांना ‘ई-मेल’द्वारे पाठविण्यात येत आहे. ‘एसएमएस’द्वारे वीजबिलाची माहिती देण्यात येत आहे. यासोबतच ग्राहकांना वीजबिल ऑनलाईनद्वारे भरण्याची सोय देखील उपलब्ध करून देण्यात आली आहे.

विदर्भात नागपूरकर आघाडीवर

नागपूर परिमंडलातील २० हजार ४०८ ग्राहकांनी गो- ग्रीन योजनेत आपला सहभाग नोंदविला असून यात नागपूर शहर मंडलातील १४ हजार १७१, नागपूर ग्रामीण मंडलातील ३ हजार २०१ ग्राहक या योजनेत सहभागी आहेत. वर्धा मंडलामध्ये ३ हजार ३६ ग्राहकांनी वीजबिलासाठी छापील कागदाऐवजी ‘ई-मेल’ व ‘एसएमएस’ला पसंती देत पर्यावरणपुरक पर्याय स्विकारला आहे. त्याखालोखाल अकोला परिमंडलातील १४ हजार २१८, अमरावती परिमंडलातील १२ हजार ७५८, चंद्रपूर परिमंडलातील ५ हजार तर गोंदिया परिमंडलातील ५ हजार ४ ग्राहकांनी कागदविरहीत असलेला हा पर्याय स्विकारला आहे.

‘गो-ग्रीन’ योजनेत सहभागी झालेल्या वीजग्राहकांना छापील वीजबिलांची गरज भासल्यास त्यांना ई-मेलद्वारे प्राप्त झालेले दरमहा वीजबिल संगणकात सॉफ्ट कॉपीमध्ये जतन करून ठेवता येईल. सोबतच महावितरणच्या www.mahadiscom.in या अधिकृत संकेतस्थळावर चालू वीजबिलासह मागील ११ महिन्यांचे असे एकूण १२ महिन्यांचे वीजबिले मूळ स्वरूपात उपलब्ध आहे.

‘गो-ग्रीन’ योजना ही काळाची गरज असून जास्तीत जास्त वीजग्राहकांनी कागदविरहित वीजबिलांसाठी या योजनेत सहभागी व्हावे, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे. ई ऑफीस प्रणालीमध्ये प्रत्यक्ष कागदाचा वापर न करता माहिती तंत्रज्ञानाचा वापर करून पेपरलेस कामावर भर देण्यात येत आहे. वीज ग्राहकांनी गो- ग्रीनच्या सवलतीचा लाभ घेतला तर छापील बिले कमी होऊन कागदाचा वापर कमी होईल व पेपरलेस कामाला चालना मिळाल्याने पर्यावरणाचेही रक्षण होईल. वीज ग्राहकांना छापील वीजबिलांची गरज भासल्यास त्यांना ई-मेल द्वारे प्राप्त झालेले दर महिन्याचे वीज बिल संगणकात सॉफ्ट कॉपीमध्ये जतन करून ठेवता येईल. सोबतच महावितरणच्या संकेतस्थळावर चालू महिन्याचे वीज बिल मूळ स्वरुपात उपलब्ध असते. आवश्यकतेप्रमाणे वीज ग्राहकांना ते डाऊनलोड करण्याची किंवा मूळ स्वरूपात रंगीत प्रिंट घेण्याची सोय आहे.

असे होता येईल योजनेत सहभागी

महावितरणच्या ‘गो-ग्रीन’ योजनेचा पर्याय निवडण्यासाठी ग्राहकांनी वीज बिलावर छापलेल्या जीजीएन (GGN) या १५ अंकी क्रमांकाची नोंदणी महावितरणच्या मोबाईल अँपद्वारे किंवा महावितरणच्या संकेतस्थळाच्या https://pro.mahadiscom.in/Go-Green/gogreen.jsp लिंकवर जाऊन करावी. याबाबतची अधिक माहिती www.mahadiscom.in संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली असल्याची माहिती महावितरणकडून दिली आहे.

Back to top button