रायगड : अलिबागच्या आरसीएफ कंपनीमध्ये भीषण स्फोट; ३ कर्मचाऱ्यांचा मृत्यू

रायगड, पुढारी वृत्तसेवा : अलिबाग तालुक्यातील थळ, वायशेत येथील आरसीएफ कंपनीत गॅस टर्बाइन युनिटच्या रेफ्रिजरेशन प्लांटमध्ये भीषण स्फोट झाला. ही घटना बुधवारी (दि.19) सायंकाळी 5 च्या सुमारास घडली. या अपघातात एक मॅनेजमेंट ट्रेनीसह अन्य दोघांचा जागीच मृत्यू झाला असून तिघेजण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
एरिझो ग्लोबल या ठेकेदाराला एसी सप्लायचे काम आरसीएफकडून देण्यात आले होते. नवीन एसी युनीटमध्ये एसी इन्स्टोलेशनचे काम सुरु असताना हा स्फोट झाला आहे. त्यात ६ कर्मचारी गंभीर जखमी झाले. स्फोटाचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.कारणाचा शोध घेण्यात येत असल्याची माहिती आरसीएफ जनसंपर्क विभागाच्या सुत्रांनी दिली आहे.
दरम्यान सात जखमींपैकी तीघा कामगारांचा मृत्यू झाला आहे. सहा कामगार ठेकेदाराचे आहेत तर एक ट्रेनी इंजीनिअर आरसीएफचा असल्याचाही माहिती मिळाली आहे. मात्र मृत्यूंबाबत कंपनी कडून अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.