हिंगोली : जनावरांच्या अंगावर मागण्या रेखाटून शेतकऱ्यांनी पुकारले आंदोलन | पुढारी

हिंगोली : जनावरांच्या अंगावर मागण्या रेखाटून शेतकऱ्यांनी पुकारले आंदोलन

गोरेगाव; पुढारी वृत्तसेवा : योग्य न्याय मिळावा, वीज मिळावी, पाण्याची व्यवस्था व्हावी या मागण्यांसाठी गारखेडा ग्रामस्थांनी आंदोलन सुरू केले आहे. दि. १७ पासून या आंदोलनाला सुरुवात झाली होती. मात्र प्रशासनाने याबाबत दखल घेतली नसल्याने मंगळवारी (दि. १८) ग्रामस्थांनी सर्व मागण्या जनावरांच्या अंगावर रेखाटून रस्त्यावर उतरून याविरोधात आवाज उठविला आहे. सेनगाव तालुक्यातील गारखेडा येथील शेतकऱ्यांनी तीव्र निषेध व्यक्त करत हे आंदोलन पुकारले आहे.

सेनगाव तालुक्यातील गारखेडा हे गाव जनावरांसहित विक्रीसाठी काढले असल्याचे निवेदन तहसीलदार यांच्यामार्फत मुख्यमंत्र्यांना देण्यात आले होते. मात्र प्रशासनाने अद्याप या शेतकरी आंदोलनाची दखल घेतली नाही. त्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी शासनाच्या निषेधार्थ हे आंदोलन पुकारले.

गारखेडा हे गाव मराठवाडा-विदर्भ सिमेवर पैनगंगा तिरावर वसलेले आहे. या छोट्याशा गावात गेल्या तीन महिन्यांपासून वीज वितरण कंपनीच्या वेळकाढु धोरणामुळे संपूर्ण गाव अंधारात आहे. गावात वीज पुरवठा केला जावा यासह विविध मागण्यांसाठी गेल्या दोन दिवसांपासून गाव एकवटलेले आहे. याबाबत तहसीलदार कार्यालय सेनगाव मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आले होते. दि १७ रोजी जिल्हा प्रशासनाच्या वतीने तहसीलदार कांबळे यांनी या आंदोलन स्थळी भेट देऊन आंदोलकांसोबत चर्चा केली. मात्र या चर्चेवर संतप्त शेतकरी मान्य नसल्याने तहसीलदार यांची भेट निष्फळ ठरली. दोन दिवस उलटून सुध्दा शासनाने आंदोलनाची दखल घेतली नसल्याच्या निषेधार्थ (दि १८) आपली गुरेढोरे रस्त्यावर उतरून आम्हाला न्याय मिळवून द्यावा, पिण्यासाठी पाणी, विज उपलब्ध करून द्यावी अशा अनेक मागण्या जनावरांच्या अंगावर रेखाटुन शासनाच्या विरोधात घोषणाबाजी केली.

हेही वाचा

Back to top button