थोडी कळ काढा, आपण पुन्हा सत्तेत असू, आमदार शेळके यांच्या नागरी सत्कारप्रसंगी आमदार नीलेश लंके यांचे भाकीत | पुढारी

थोडी कळ काढा, आपण पुन्हा सत्तेत असू, आमदार शेळके यांच्या नागरी सत्कारप्रसंगी आमदार नीलेश लंके यांचे भाकीत

वडगाव मावळ : सत्ता असो व नसो, विकासासाठी प्रयत्न करत राहणे गरजेचे असते. जनतेने दाखवलेल्या विश्वासाला तडा जाता कामा नये, असे आवाहन करून थोडी कळ काढा, आपण पुन्हा सत्तेत असू अन मुख्यमंत्रीही आपलाच असेल, जनतेने ठरवलं तर काहीही होऊ शकते, असे भाकीत आमदार नीलेश लंके यांनी केले.

नगराध्यक्ष मयूर ढोरे यांच्या पुढाकाराने वडगाव मावळ येथील ग्रामदैवत श्री पोटोबा महाराज मंदिर प्रांगणात मोरया प्रतिष्ठान, मोरया महिला प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित आमदार सुनील शेळके यांचा नागरी सत्कार व विविध स्पर्धांचा बक्षीस वितरण प्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी मंत्री मदन बाफना होते.

या वेळी जिल्हा बँकेचे संचालक माऊली दाभाडे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष गणेश खांडगे, जिल्हा परिषदेचे माजी सभापती बाबूराव वायकर, सारिका शेळके, बाळासाहेब ढोरे, मंगेश ढोरे, सुभाषराव जाधव आदी उपस्थित होते.

आमदार शेळके यांना श्री हनुमानाची मूर्ती देऊन जाहीर नागरी सत्कार करण्यात आला. तसेच, आमदार शेळके यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित पाककला, चित्रकला, निबंध आदी स्पर्धांचे बक्षीस वितरण करण्यात आले.

महाविकास आघाडी सरकारमध्ये 32 कोटींचा निधी

मयूर ढोरे म्हणाले, की नगरपंचायत स्थापनेनंतर राज्यात विरोधी सरकार असल्याने निधी मिळाला नाही. परंतु, महाविकास आघाडी सरकार आले आणि आमदार शेळके यांच्या पाठपुराव्यामुळे तब्बल 32 कोटींचा निधी आला. 37 कोटींची पाणी योजना मंजुरीच्या टप्प्यावर आहे. 32 कोटींच्या प्रशासकीय इमारतीचे काम सुरू आहे, असा जवळपास 100 कोटी रुपयांचा निधी आमदार शेळके यांनी उपलब्ध करून दिल्याचे सांगितले.

प्रत्येक दारापर्यंत रस्ता, लाईट पोहोचविणार

निधी आणणे, विकासकामे करणे ही आमची जबाबदारी आहे, टिका टिपण्णी आमचा धंदा नाही, विकासाची स्पर्धा करणे हे आमचे ध्येय आहे, असे स्पष्ट करत वडगाव नगरपंचायतच्या आगामी निवडणुकीपूर्वी प्रत्येक दारापर्यंत रस्ता, लाईट, पाणी पोचवण्याचे आश्वासन आमदार सुनील शेळके यांनी दिले.

Back to top button