पैठण: तरुणाचा अनैतिक संबंधातून खून; नातेवाईकांनी मृतदेहासह गाठले पोलीस ठाणे | पुढारी

पैठण: तरुणाचा अनैतिक संबंधातून खून; नातेवाईकांनी मृतदेहासह गाठले पोलीस ठाणे

पैठण, पुढारी वृत्तसेवा : पैठण शहरातील नाथ गल्ली येथील एका तीस वर्षे तरुणाचा अनैतिक संबंधातून खून झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. नातेवाईकांनी मृतदेह थेट पैठण पोलीस ठाण्यात नेऊन आरोपीवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. शिवाजी गोपीनाथ टकले ( वय ३० रा. नाथगल्ली पैठण ) असे खून झालेल्‍या तरुणाचे नाव आहे.

शिवाजी टकले पहाटे घरी आला असता अचानक त्याच्या छातीत दुखत असल्याने बेशुद्ध पडला. हा प्रकार घरच्या व नातेवाईकांच्या लक्षात आला. यानंतर प्रथम त्‍याला शहरातील एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. परंतु येथील डॉक्टरने शासकीय रुग्णालयात दाखल करण्याचा सल्ला दिल्यामुळे या तरुणाच्या नातेवाईकांनी मंगळवारी रोजी सकाळी साडेआठ वाजता पैठण शहरातील शासकीय रुग्णालयात या तरुणाला नेले. याठिकाणी सदरील तरुणाला मृत घोषित करण्‍यात आले. तसेच शवविच्‍छेदन करावे लागेल, असे सांगितल्यामुळे नातेवाईकांनी मृतदेह थेट आपल्या राहत्या घरी नेला. अंत्यविधीची तयारी सुरू असताना काही नातेवाईकांनी व मित्राने सरकारी दवाखान्यातून पोस्टमार्टम करणे योग्य असल्याचे सांगितला. या तरुणाचा मृतदेह पुन्हा दुपारी शासकीय रुग्णालयात नेण्यात आला.

यानंतर  नातेवाईकांनी मृतदेह थेट पैठण पोलीस ठाण्यात आणून संबंधित प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली.  हा खून अनैतिक संबंधातून झाल्याचा आरोप केला. त्यामुळे काही काळ पोलीस ठाण्यात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांनी नातेवाईकांची समजुत काढून अंत्यविधी झाल्यानंतर संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याचे आश्वासन दिले.

हेही वाचा

Back to top button