दिवाळी पाडव्याला ‘गंगाखेड शुगर’च्या १३ व्या गळीत हंगामाचा बॉयलर पेटणार | पुढारी

दिवाळी पाडव्याला 'गंगाखेड शुगर'च्या १३ व्या गळीत हंगामाचा बॉयलर पेटणार

गंगाखेड (परभणी); पुढारी वृत्तसेवा : मराठवाडा परिसरात सर्वाधिक ऊस गाळपाचा उच्चांक गतवर्षी करत तालुक्यातील माखणी येथील गंगाखेड शुगर अँड एनर्जी या खासगी साखर कारखान्याचा सन २०२२-२३ च्या १३ व्या गळीत हंगामास सुरूवात होणार आहे. या कारखान्याचा बॉयलर अग्निप्रदीपन समारंभ दिवाळी पाडव्याच्या दिवशी अर्थात २६ ऑक्टोबर रोजी पेटणार असल्याची व ३ नोव्हेंबरला अर्थात गुढीपाडव्याच्या दिवशी कारखाना सुरू होणार असल्याची माहिती गंगाखेड शुगरच्या व्यवस्थापनाकडून मिळाली आहे.

सन २०२२-२३ च्या गळीत हंगामासाठी कारखान्याच्या कार्यक्षेत्रात समाधानकारक पाऊस झाल्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण झालेले आहे. त्यामुळे उसाचे क्षेत्र व कारखान्याकडील नोंद मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. तसेच कार्यक्षेत्रातील कोणत्याही ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा ऊस गाळपाअभावी शिल्लक राहणार नाही याची दक्षता कारखाना प्रशासनाकडून नियोजनबद्ध करण्यात आलेली आहे. त्यामुळे कारखाना कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी जास्तीत- जास्त ऊस गाळपासाठी कारखान्यात द्यावा असे आवाहन गंगाखेड शुगर कारखाना व्यवस्थापनाकडून करण्यात आले आहे.

मराठवाड्यात गतवर्षी ऊस गाळपाचा सर्वाधिक उच्चांक गंगाखेड शुगरच्या नावे आहे. कारखान्यातील प्रशासक व अधिकारी कर्मचाऱ्यांच्या सांघिक प्रयत्नाने अनेक तांत्रिक व प्रशासकीय अडचणीवर मात करत गंगाखेड शुगरने १२ व्या गळीत हंगामात जवळपास १३ लाख मॅट्रिक टन उसाचे गाळप करत ऊस गाळपाचा विक्रम रचला. यावर्षीच्या १३ व्या गळीत हंगामासाठी कारखाना प्रशासन सज्ज झाले असून येत्या दिपावली पाडव्याला कारखान्याचा बॉयलर अग्निप्रदीपन समारंभ पेटणार आहे. दिवाळी पाडव्याच्या दिवशी (दि.२६) कारखान्याचे बॉयलर पेटणार असून दि.३ नोव्हेंबर रोजी प्रत्यक्षात ऊस गाळप होणार असल्याची माहिती कारखाना व्यवस्थापनाकडून प्राप्त झाली.

हेही वाचलंत का? 

Back to top button