पंतप्रधानांना मिळालेल्या भेटवस्तुंचा १२ ऑक्टोबरपर्यंत लिलाव | पुढारी

पंतप्रधानांना मिळालेल्या भेटवस्तुंचा १२ ऑक्टोबरपर्यंत लिलाव

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : पंतप्रधानांना मिळालेल्या स्मृतीचिन्ह, भेटवस्तू लिलावाची मुदत वाढवण्यात आली आहे. स्मृतीचिन्हाचा हा लिलाव १२ ऑक्टोबरपर्यंत सुरू राहणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरवरून यासंबंधी माहिती दिली. ‘मला गेल्या काही वर्षांत मिळालेल्या अनेक खास भेटींपैकी ही एक आहे. लोकांच्या इच्छेला मान देऊन स्मृतिचिन्हांचा लिलाव १२ तारखेपर्यंत वाढविण्यात आला आहे’ अशी भावना सांस्कृतिक मंत्रालयाच्या ट्विटला उत्तर देताना पंतप्रधानांनी व्यक्त केली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना २०२२ साली देण्यात आलेल्या भेटवस्तू आणि स्मृतिचिन्हांचा ई-लिलाव १७ सप्टेंबर रोजी त्यांच्या वाढदिवसापासून सुरू झाला. २ ऑक्टोबर पर्यंत हा लिलाव प्रक्रिया चालणार होती. गेल्या काही वर्षांमध्ये, पंतप्रधानांना देशाच्या कानाकोपऱ्यातील प्रतिष्ठित व्यक्ती आणि शुभचिंतकांकडून सन्मानित करण्यात आले आहे. त्यांना असंख्य स्मृतिचिन्ह आणि भेटवस्तू मिळाल्या आहेत. यात ऐतिहासिक भेटवस्तूंमध्ये उत्कृष्ट चित्रे, शिल्पे, हस्तकला आणि लोक कलाकृतींचा समावेश आहे.

नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्ट, नवी दिल्ली आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सादर केलेल्या स्मृतीचिन्ह आणि भेटवस्तूंच्या विशेष प्रदर्शनासाठी अभ्यागतांचे स्वागत करण्यासाठी सज्ज आहे. पंतप्रधानांना दिलेल्या १२०० भेटवस्तू आणि स्मृतिचिन्हांचा लिलाव होणार आहे. या भेटवस्तूंमध्ये, अयोध्येतील श्री राम मंदिर आणि वाराणसीतील काशी-विश्वनाथ मंदिराच्या प्रतिकृती आणि मॉडेल्स आकर्षणाचे केंद्र आहेत. दरम्यान, पंतप्रधानांच्या भेटवस्तूंचा लिलाव पहिल्यांदा जानेवारी २०१९ मध्ये सुरू झाला. यशस्वी लिलावाच्या मालिकेतील ही चौथी वेळ आहे. लिलावाद्वारे जमा होणारा पैसा ‘नमामि गंगे’ कार्यक्रमासाठी दान केला जाणार आहे.

हेही वाचा :

Back to top button