लांजात कन्स्ट्रक्शन फर्मच्या बँक खात्यावरील ९२ लाखांच्या रक्कमेवर हॅकरर्सचा डल्ला | पुढारी

लांजात कन्स्ट्रक्शन फर्मच्या बँक खात्यावरील ९२ लाखांच्या रक्कमेवर हॅकरर्सचा डल्ला

लांजा (रत्नागिरी) : पुढारी वृत्तसेवा : लांजा येथील यश कन्स्ट्रक्शन फर्मच्या बँक ऑफ इंडिया लांजा शाखेतील खात्यामधून तब्बल ९२ लाख ५० हजार रुपयांची ऑनलाइन फसवणूक झाल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. हॅकर्सकडून बँकेची स्टार टोकन सिस्टीम ही आर्थिक व्यवहाराची सिस्टीम हॅक करून ऑनलाईन नेट बँकिंगद्वारे पैसे परस्पर काढून फसवणूक केली असल्याचा गुन्हा लांजा पोलीस ठाण्यात दाखल झाला आहे. ऑनलाईन फसवणूक झाल्याने बँकेच्या ऑनलाईन सिस्टीमच्या विश्वासार्हतेबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. बँक ऑफ इंडिया या राष्ट्रीयकृत बँकेत घडलेल्या या घटनेमुळे लांजा शहरात एकच खळबळउडाली आहे.

पोलिसांनी दिलेल्‍या माहितीनुसार, लांजा शहरातील प्रतिष्ठीत शासकीय कंत्राटदार व यश कन्स्ट्रक्शनचे मालक सुधीर भिंगार्डे यांनी याबाबत फिर्याद दाखल केली. लांजात यश कन्स्ट्रक्शन ही शासकीय बांधकाम कामे करणारी मोठी फर्म आहे. या फर्मचे खाते बँक ऑफ इंडिया लांजा शाखेत आहे. नेट बँकिंगद्वारे ते व्यवहार करतात. या फर्मचे बँक ऑफ इंडिया या ठिकाणी गेले ३० वर्षे खाते आहे.

बँक खात्यातून ७ ऑक्टोबरला बँक खात्याला लिंक असलेल्या सुधीर भिंगार्डे यांच्या मोबाईल नंबरवर बँक खात्यातून पैसे कमी झाल्याचे मेसेज आले. कोणताही व्यवहार केलेला नसताना हे पैसे का कमी झाले म्हणून बँकेच्या स्टार टोकन सिस्टीमकडून चेक करण्याचा प्रयत्न करण्यात आला. नेट बँकिंग करिता असलेले बँकेचे स्टार अप टोकन ही बँकिंग सेवा त्यादिवशी चालू नव्हती. म्हणून फर्मचे मॅनेजर वसंत मसणे यांनी बँक ऑफ इंडियाच्या लांजा शाखेत जाऊन याची खातरजमा केली. त्यावेळी त्यांनी बँक खात्याचा तपशील काढला असता त्यातील ९२ हजार ५० लाख रुपयाच्या पैसे परस्पर काढल्याच्या नोंदी दिसून आल्या.

सुधीर भिंगार्डे यांनी स्वतः बँकेत जाऊन सदर घटनेची खात्री केली. त्यांनी बँक मॅनेजर यांना आम्ही ही रक्कम काढली नसताना हे पैसे खात्यातून कमी का झाले याची पडताळणी करण्याची विनंती केली. ही पडताळणी केली असता कोणीतरी अज्ञात इसमाने दि. ४ ऑक्टोबर २०२२ रोजी दुपारी एक ते दीड वाजताच्या दरम्यान ही रक्कम फसवणूक करून परस्पर काढून घेतल्याची सायबर सेल चोरी केल्याची खात्री झाली. ही रक्कम खात्यातून कमी झाल्यासंदर्भात यश कन्स्ट्रक्शनकडून या कालावधीत कोणताही आर्थिक व्यवहार झालेला नाही, हे बँकेत पडताळणी केल्यानंतर स्पष्ट झाले. यामुळे अज्ञातांनी ऑनलाइन फसवणूक केल्याचे उघडकीस आले.

या घटनेची लांजा शहर परिसरात माहिती होताच एकच खळबळ उडाली आहे. राष्ट्रीयकृत बँक असलेल्या बँक ऑफ इंडिया यामधील स्टार टोकन ॲप हे व्यवहार करण्यासाठी अतिशय सुरक्षित असे म्हणून वापरले जाते. परंतु याच नेट बँकिंग सेवेतच ही फसवणूक झाल्याने सर्वसामान्य नागरिकांमध्ये आपल्या बँक खात्याविषयी भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

हेही वाचा

नाशिकजवळील अपघातात वाशीम जिल्ह्यातील १ ठार; ११ प्रवाशी जखमी 

नाशिक : पुणे-इंदोर महामार्गावर गॅस सिलिंडर घेऊन जाणारा ट्रक पलटी झाल्याने स्फोट

भंडारा : चारित्र्याच्या संशयावरून पत्नीची डोक्यात वरवंटा घालून हत्या; पिंपळगाव येथील घटना

Back to top button