यवतमाळमध्ये दमदार पाऊस; दोन तालुक्यांत अतिवृष्टी | पुढारी

यवतमाळमध्ये दमदार पाऊस; दोन तालुक्यांत अतिवृष्टी

यवतमाळ; पुढारी वृत्तसेवा : यवतमाळ शहरासह जिल्ह्याच्या विविध भागात जोरदार पाऊस सुरू आहे. वणीसह मारेगाव तालुक्यात अतिवृष्टी झाली. आज बेंबळा प्रकल्पाचे दोन दरवाजे उघडण्याची शक्यता वर्तवण्यात आली असून दोन्ही तीरावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून शेतकरी मोठ्या पावसाची प्रतीक्षा करीत होते. गुरुवारी रात्री जिल्ह्यात रिमझिम पावसाला सुरुवात झाली. मध्यरात्रीनंतर अनेक ठिकाणी पावसाचा जोर वाढला. शुक्रवारी सकाळी ८ वाजेपर्यंत यवतमाळ जिल्ह्यात सरासरी २९.१ मिमी पावसाची नोंद झाली. वणी आणि मारेगाव तालुक्यात अतिवृष्टी झाली असून, मारेगाव तालुक्यात ७८.१ मिमी इतका पाऊस झाला. बाभूळगाव तालुक्यातही अनेक सर्कलमध्ये गेले दोन दिवस पाऊस बरसत आहे. बेंबळा नदी प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या पावसामुळे प्रकल्पाच्या जलाशय पातळीत वेगाने वाढ होत आहे. जलाशयातील पाणी पातळीवर नियंत्रण ठेवण्याकरिता, तसेच धरण सुरक्षिततेसाठी आज धरणाचे दोन दरवाजे २५ सेमीने उघडून ५० घनसेमी पाण्याचा विसर्ग करण्यात येणार आहे. बेंबळा प्रकल्प विभागाचे कार्यकारी अभियंत्यांनी शुक्रवारी याबाबतचे आदेश दिले. तसेच सर्व संबंधित यंत्रणांसह दोन्ही तीरांवरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. नदी काठच्या गावांनी खबरदारी घेण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे.

हेही वाचलंत का?

Back to top button