समाविष्ट गावांची तहान टँकरवरच; भर पावसाळ्यात टँकरने पाणीपुरवठा | पुढारी

समाविष्ट गावांची तहान टँकरवरच; भर पावसाळ्यात टँकरने पाणीपुरवठा

मांजरी : पुढारी वृत्तसेवा: आटलेले जलस्रोत, पावसाने दिलेली ओढ आणि महापालिकेने झटकलेली जबाबदारी यामुळे समाविष्ट गावांचा पाणी प्रश्न अधिकच गंभीर झाला आहे. येथील नागरिकांना सध्या पिण्याच्या पाण्यासाठी मोठी वणवण करावी लागत आहे. आठ-दहा दिवस प्रतीक्षा करूनही विकतही पाण्याचा टँकर मिळेनासा झाला आहे. त्यामुळे नागरिकांची मोठी परवड झाली असून पाण्यासाठी नेमके काय करावे, असा प्रश्न त्यांना सतावत आहे. या भागात लाखोे रुपयांच्या सदनिका घेऊनही पाण्यासाठी नागरिक त्रस्त आहेत. परिसरातील मांजरी, शेवाळेवाडी ही गावे पालिकेत समाविष्ट होऊन एक वर्ष झाले आहे.

मात्र, या गावांना पाण्यासह विविध प्राथमिक सुविधा पुरविण्यात पालिका प्रशासन वेग घेऊ शकले नाही. पावसाने ओढ दिल्याने सध्या या भागात पाण्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. ही गावे विकासासाठी पीएमआरडीएकडे असल्याने पाणीपुरवठ्याची जबाबदारी त्यांचीच असल्याचे सांगून पालिकेने हात झटकले आहेत. तर पीएमआरडीएने बांधकाम व्यावसायिकांना आपापल्या विकसित केलेल्या सोसायट्यांना पाणी पुरवठ्याची जबाबदारी दिली आहे.

यापूर्वी ग्रामपंचायतकडून ज्या भागात पाणीपुरवठा व्यवस्था होती, त्याच व्यवस्थेवर पालिकेकडून पाणीपुरवठा केला जात आहे. मात्र, जेथे ही व्यवस्था नाही अशा मोठ्या भागात कोणत्याही प्रशासनाकडून पाणीपुरवठा होत नाही. हे सर्व मिळकतदार स्वत: घेतलेल्या कूपनलिकेवर अवलंबून आहेत. या कूपनलिकांनाच आता पाणी नसल्याने शेवाळेवाडी, सोलापूर रोड, मांजरीफार्म, महादेवनगर, घुलेवस्ती, गोपाळपट्टी, दरडी, चिलई, मुंढवा- मांजरी रस्ता आदी भागात पिण्याच्या पाण्यासह वापराच्या पाण्याचाही मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.

खासगी टँकरचा धंदा तेजीत
पाण्याचे स्रोत बंद झाल्याने सध्या परिसरात पाण्याचा मोठा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे खासगी पाण्याच्या टँकरला मोठी मागणी आहे. मात्र, हे टँकरही कमी पडू लागले असून रात्री-अपरात्रीही ते पाणी टाकण्याचे काम करीत आहेत. टँकर लवकर मिळावा म्हणून जास्त पैसे मोजण्याबरोबरच थेट पाणी भरणा केंद्रावर जाऊनच टँकर घेऊन येण्याचा प्रयत्न काही नागरिक करताना दिसतात.

‘ पाणीपुरवठा विभागाला उद्भवलेल्या परिस्थितीची माहिती दिली जाईल. काही ठिकाणी टँकरने पाणी पुरवठा कसा करता येईल, याबाबत प्रयत्न करण्यात येईल.’

                   – प्रसाद काटकर, सहायक आयुक्त हडपसर-मुंढवा क्षेत्रीय कार्यालय.

Back to top button