पोटगीही न देणार्‍या पतीने एका दिवसात मोजले 15 लाख..

पोटगीही न देणार्‍या पतीने एका दिवसात मोजले 15 लाख..
Published on
Updated on

पुणे : पुढारी वृत्तसेवा :  लग्नानंतर दोन व्यक्ती एका नव्या नात्याची सुरुवात करतात. परंतु, अलीकडे बदलत्या जीवनशैलीमुळे दोघांत वैचारिक कारणांमुळे मतभेद निर्माण होतात. घटस्फोटाशिवाय कुठलाही पर्याय उरत नाही. यादरम्यान, पोटगीचा मुद्दाही
समोर येतो. बहुतांश प्रकरणांत पोटगी टाळण्यासाठी विविध युक्त्या काढल्या जातात. या प्रकारचेच एक प्रकरण पुण्यात घडले असून, पैसे नसल्याचे कारण सांगून पोटगी थकविणार्‍या पतीने कायमस्वरूपी प्रकरण निकाली लावण्यासाठी एका दिवसात
15 लाख मोजल्याने या प्रकरणाची न्यायालयात चांगलीच चर्चा रंगली.

राज आणि सिमरण (दोघांची नावे बदलली आहेत.) दोघेही उच्चशिक्षित. राज एका कंपनीत नोकरीला, तर सिमरण गृहिणी. 2002 मध्ये लग्नगाठ बांधल्यानंतर त्यांना 2005 मध्ये मुलगी झाली. त्यांनी तिचे नाव चुटकी ठेवले. मुलीच्या जन्मानंतर ते दोघेही एकमेकांपासून विभक्त झाले. 2014 मध्ये घटस्फोटाचा दावा सुरू असताना कौटुंबिक न्यायालयाने सिमरणला 7 हजार रुपये पोटगी देण्याचे आदेश दिले. त्यानंतर त्यामध्ये टप्प्याटप्प्याने वाढ होऊन पोटगीची रक्कम दरमहा 10 हजार रुपयांपर्यंत पोहोचली, तर ठाणे येथील न्यायालयाने चुटकीला पोटगी स्वरूपात तीन हजार रुपये देण्याचे आदेश दिले. यादरम्यान, राजकडून पोटगी वारंवार थकविली गेल्याने 2014 पासून आत्तापर्यंत त्याविरोधात तीन खटले दाखल करण्यात आले. त्यानंतर त्याने पोटगीची रक्कमही दिली.

2022 पासून 1 लाख 80 हजार रुपयांची पोटगीची रक्कम थकविल्याने सिमरणने पोटगीसाठी पुन्हा न्यायालयाचे दरवाजे ठोठावले. या वेळी न्यायालयाने राजला पोटगीची रक्कम भरण्यास सांगितले व तत्काळ 50 हजार रुपये देण्याचा आदेश दिला. या वेळी राजने पैसे नसल्याची पळवाट काढली. अखेर राज व सिमरणच्या वकिलांनी मध्यस्थी केली. दोघांनी एकरकमी पोटगीला मान्यता दिली. मागील दोन वर्षांपासून पोटगी थकविणार्‍या राजने एका दिवसात 15 लाखांचा डीडी सिमरणच्या नावे जमा केला. या वेळी तिनेही भविष्यातील पोटगी व इतर अधिकार कायमस्वरूपी सोडून देत पोटगीसाठी चालू असलेले खटले काढून घेण्याची ग्वाही दिली. भविष्यात स्वत:साठी, तसेच मुलीसाठी कोणत्याही प्रकारचे पोटगीचे दावे, फौजदारी अथवा दिवाणी दावा करणार नाही, असे कबूल केले.

प्रत्येक थकीत पोटगीच्या केसला वॉरंट काढल्याशिवाय पती पैसे भरत नव्हता. मुलगी सध्या उच्च शिक्षण घेत असून, तिला सतत पैसे लागतात. तसेच, पती-पत्नी आता उतारवयात आहेत. त्यामुळे, एकरकमी पोटगीचा पर्याय पतीला देऊन समझोता करून ही केस संपवण्यात आली.

– अ‍ॅड. भाग्यश्री गुजर-मुळे, पत्नीतर्फे वकील.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news