

नगर : पुढारी वृत्तसेवा : अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याच्या गुन्ह्यात जिल्हा व सत्र न्यायलायाने आरोपीला दोषी धरीत दहा वर्षे सक्तमजुरी व चार रुपयांचा दंड ठोठावला आहे. नाना लक्ष्मण शिंदे (वय 35, रा. भिंगारदिवे मळा, सावेडी, नगर) असे आरोपीचे नाव आहे.
अधिक माहिती अशी की, प्रेमदान हडको येथील भिंगारदिवे मळा येथील पीडित मुलगी शिवण क्लासला जाते म्हणून घरातून बाहेर पडली.
परंतु, संध्याकाळपर्यंत ती परत आली नाही. त्यामुळे पीडितेच्या आईने तिचा शोध घेतला. त्यानंतर पीडितेच्या आईला पुतणीने सांगितले की, पीडित मुलगी ही आरोपी नाना शिंदे याच्याबरोबर निघून गेली. याबाबत पीडितेच्या आईने तोफखाना पोलिस ठाण्यात आरोपी नाना शिंदे याच्याविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल केला.
आरोपीच्या नातेवाईकांकडे चौकशी केली असता त्यांनी पीडित मुलगी व आरोपी हे शिराळ चिचोंडी येथे असल्याचे सांगितले. त्यानंतर मुलीच्या नातेवाईकांनी तिला व आरोपीला शिराळ चिचोंडी येथून ताब्यात घेऊन तोफखाना पोलिस ठाण्यात हजर केले. दरम्यान, पीडित मुलीने पोलिसांना सांगितले की, आरोपीची आणि माझी एक महिन्यापूर्वी ओळख झाली.
माझे तुझ्यावर प्रेम आहे. माझ्याबरोबर फिरायला येशील का? असे म्हणाला. त्यानंतर 12 मार्च 2018 रोजी आरोपीने प्रेमदान चौकातील संस्कृती हॉटेलसमोरून चारचाकी वाहनात बसवून नेले. त्यानंतर पांढरीपूल येथे एका घरामध्ये मुक्कामी राहिले. आरोपीने तिथे पीडितेवर अत्याचार केला. याबाबत पीडित मुलीच्या आईच्या फिर्यादीवरून आरोपीविरुद्ध अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला.
उपनिरीक्षक संजय सोनी व सहायक पोलिस निरीक्षक रवींद्र पिंगळे व पोलिस हेडकॉन्स्टेबल जी. ए. केदार यांनी गुन्ह्याचा तपास करून दोषारोपपत्र न्यायालयात सादर केले. हा खटला जिल्हा व सत्र न्यायाधीश एम. एच. मोरे यांच्या न्यायालयात चालला. खटल्यात सरकार पक्षातर्फे 13 साक्षीदार तपासण्यात आले. सरकार पक्षाचा पुरावा व युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायालयाने आरोपीला विविध कलमांन्वये दहा वर्षे सक्तमजुरी व चार हजार रुपयांचा दंड केला. सरकार पक्षातर्फे सहायक सरकारी अभियोक्ता अॅड. मनीषा पी. केळगंद्रे-शिंदे यांनी पाहिले.