मधुमेह रुग्णांसाठी जांभूळ ठरतेय वरदान | पुढारी

मधुमेह रुग्णांसाठी जांभूळ ठरतेय वरदान

भोकरदन, पुढारी वृत्तसेवा : पावसाळ्याची चाहूल लागताच तालुक्यात जांभळाची मोठी आवक सुरू होते. मधुमेह रुग्ण मोठ्या प्रमाणात जांभळांचे या काळात सेवन करताना दिसतात. सध्या भोकरदनच्या बाजारात मोठ्या प्रमाणात जांभळाची आवक वाढली आहे. बाजारात सर्वत्र निळेशार जांभळे नागरिकांचे लक्ष वेधून घेत आहेत. जांभूळ हे औषधोपयोगी फळ आहे. मात्र, अलीकडे जांभळाची झाडे दुर्मिळ होत असल्याचे दिसून येते.

खेड्यापाड्यात निसर्गाची काळी मैना म्हणून जांभळाची ओळख आहे. मृग नक्षत्रात जांभूळ सेवनाला विशेष आरोग्यदायी महत्त्व आहे. जांभूळ बाजारात दाखल झाले असून, जांभळाचा गरच नव्हे तर झाडाचे पान, साल, खोड, बिया यातही औषधी गुणधर्म असल्याने आयुर्वेदात या वृक्षाला मोठे महत्त्व आहे. मे, जून महिन्यात जंगलाची काळी मैनाजांभळाचे आगमन होते. तुरट-गोड चवीच्या जांभळात लोहाचे प्रमाण जास्त असते.

मधुमेहाबरोबरच रक्तदाब, कॅन्सर, हृदयरोग, अस्थमा या रोगात जांभळाचे सेवन या रोगांना थोपविण्यास उपयुक्त ठरते. रोज चार जरी जांभळे खाल्ली तरी शरीरातील साखरेचे प्रमाण नियंत्रित ठेवणे शक्य होते. रक्तातील हिमोग्लोबिनचे प्रमाण वाढविण्याबरोबरच हिरड्या व आरोग्य चांगले राखण्यात जांभूळ महत्त्वाची भूमिका निभावतात.

उत्तम सौंदर्य प्रसाधन

जांभूळ हे उत्तम सौंदर्य प्रसाधन म्हणूनही काम करते. यापासून व्हिनेगर जेली, शरबत आदी बनविण्यास अलीकडे सुरुवात झाली असून, यातून नवीन उद्योगाची उभारणी होऊ लागली आहे. कंपन्यांकडून थेट जांभूळ खरेदी होत असल्याने त्याचा परिणाम खुल्या बाजारपेठेवर झाला आहे. बाजारातही जांभळे कमी प्रमाणात दिसू लागली आहेत.

हेही वाचलंत का?

Back to top button