नांदेड: पाकिस्तानी व्हॉटस्अॅप ग्रुप प्रकरण: शकीलने मोबाईल फोडल्याने वाढले गूढ | पुढारी

नांदेड: पाकिस्तानी व्हॉटस्अॅप ग्रुप प्रकरण: शकीलने मोबाईल फोडल्याने वाढले गूढ

बाळासाहेब पांडे

नायगाव: पाकिस्तानी व्हॉटस्अॅप ग्रुपशी कनेक्शन असलेल्या व गुजरात एटीएसने अटक केलेल्या नरसी येथील शेख शकील सतार याने फोडलेला मोबाईल शोधण्यासाठी सुरतचे पोलिस आठ दिवसानंतर त्याला घेवून नरसी येथे दाखल झाले. परंतु, त्याचा मोबाईल न सापडल्याने संशय बळावला आहे. दरम्यान त्याचे आई-वडील नरसी सोडून दुसरीकडे राहायला गेले आहेत. त्यांचा शोध घेऊन सखोल चौकशी करून पोलीस रवाना झाल्याने या प्रकरणाचे गूढ वाढले आहे.

नेमकं प्रकरण काय आहे?

  • नरसी येथील शेख शकील शेख सतार याचे पाकिस्तानी व्हॉटस्अॅप ग्रुपशी कनेक्शन
  • देश विघातक कारवाया करणे, कट रचणे यामध्ये सहभाग
  • या प्रकरणी शकील याला गुजरात एटीएसने १२ मेरोजी अटक केली.
  • शकिलने आपला मोबाईल फोडून टाकल्याने या प्रकरणाचे गूढ वाढले आहे.
  • मोबाईल शोधण्यासाठी सुरतचे पोलिस नरसी येथे दाखल

पाकिस्तानी व्हॉटस्अॅप ग्रुपशी कनेक्ट राहून देश विघातक कारवाया करणे, पत्रकार, नेत्यांची हत्या व शस्त्रे खरेदी करण्याचा कट रचणे, या प्रकरणी नायगाव तालुक्यातील नरसी येथील शेख शकील याला गुजरात एटीएसने १२ मेरोजी अटक केली आहे. त्यानंतर नांदेड जिल्ह्यात खळबळ उडाली होती. आपले बिंग फुटले, याची कुणकुण लागल्याने शकिलने आपला मोबाईल फोडून टाकला होता. तो मोबाईल कुठे फेकला, याचा शोध घेण्यासाठी सुरतचे पोलीस त्याला घेवून पुन्हा नरसीत दाखल झाले होते.

मुलाने केलेल्या गैर कृत्याची ठोकर मनाला पोहोचल्याने शकिलचे आई-वडील यांनी नरसीतील घराला कुलूप लावून शकीलचे आजोळ कुंचेली येथे राहावयास गेले होते. चौकशीत हे कळाल्याने सुरत पोलिसांचे पथक कुंचेली (ता. नायगाव) येथेही चौकशीसाठी गेले होते. शकिलने फोडलेल्या मोबाईलचा शोध त्याच्या घरासोबतच शेतातही घेतला. परंतु, याबाबत पोलिसांनी गुप्तता पाळली असल्याने माहिती मिळू शकली नाही.

शकीलने मोबाईल फोडून टाकल्याचे पोलिसांना सांगितले. पण तो कुठे लपवला याचा तो थांगपत्ता लागू देत नव्हता. म्हणून सुरत पोलीस शकीलला घेवून पुन्हा नरसीत शनिवारी दाखल झाले. त्याने फोडलेल्या मोबाईलचा शोध घेतला जात आहे.

शकीलच्या संशयास्पद हालचालीकडे वडिलांचे दुर्लक्ष

नरसी येथे मुखेड रोडवरील मेहबूबनगरातील मशिदीजवळ शकील शेतकरी कुटुंबात राहत होता. तो नेहमी समाजापासून अलिप्त राहत असे. त्याच्या संशयास्पद विघातक हालचाली सुरू असल्याचे काही लोकांच्या लक्षात आले होते. ही बाब त्याच्या वडिलांच्या कानावर घातली होती. पण याकडे वडिलांनी दुर्लक्ष केले. पाकिस्तानच्या व्हॉटस् अॅप ग्रुपमध्ये शकील याने चॅटिंग केल्याचे आढळून आले आहे. त्यातून अनेक समाजविघातक बाबी समोर आल्याने सुरत एटीएसने शकीलला ताब्यात घेतले आहे.

शकीलच्या आजी-आजोबाची सखोल चौकशी

शंकरनगर पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीप्रमाणे शकीलचे आई- वडील शकीलच्या आजोळी म्हणजे नरसीपासून पाच- सात किलोमीटर अंतरावरील कुंचेली येथे राहायला गेले होते. तेथे त्यांची पोलिसांसोबत भेट झाली. तर गावातील इतरांकडून माहिती काढली असता पोलीस येण्याची खबर लागताच आई- वडील गावातून निघून गेले. त्यानंतर सुरत पोलिसांनी शकीलच्या आजी-आजोबाची सखोल चौकशी केल्याचे समजते.

हेही वाचा 

Back to top button