सौरऊर्जा प्रकल्प असूनही जिल्हा परिषदेत अंधार | पुढारी

सौरऊर्जा प्रकल्प असूनही जिल्हा परिषदेत अंधार

सोलापूर : पुढारी वृत्तसेवा विजेची गरज पूर्ण व्हावी, यासाठी जिल्हा परिषदेच्या इमारतीवर सौरऊर्जा प्रकल्प उभारण्यात आला आहे. या प्रकल्पातून जिल्हा परिषदेचा विजेचा पुरवठा होतो. मात्र, बुधवारी पूर्वनियोजित भारनियमन असल्याने दिवसभरात गरजेपुरता वीजपुरवठा करण्याची क्षमता या प्रकल्पात नसल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे लाखो रुपये खर्चाचा हा प्रकल्प म्हणजे पांढरा हत्ती पोसल्याचा प्रकार असल्याची चर्चा जिल्हा परिषदेत होती.

महावितरण कंपनीकडून बुधवारी शहरात वीजपुरवठा करणार्‍या रोहित्रांच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले होते. यामुळे दुपारी बारा ते सायंकाळी पाच यावेळेत जिल्हा परिषदेत वीजपुरवठा बंद होता. वीजपुरवठा बंद झाल्याने दिवसाढवळ्याही जिल्हा परिषद पूणर्र् अंधारात बुडून गेल्याचे चित्र दिसून येत होते. यामुळे जिल्हा परिषदेत सर्वत्र शुकशुकाट दिसून येत होता.

जिल्हा परिषदेच्या इमारतीस तत्कालीन अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी तानाजी गुरव यांच्या काळात बंदिस्त काचने सुशोभिकरण करण्यात आले आहे. यामुळे बाहेरून आकर्षक वाटणारी जिल्हा परिषद आतून मात्र अंधारात असते. त्यामुळे याठिकाणी दिवसाही दिवे चालू ठेवावे लागतात. अशात पावसाळ्याच्या दिवसात वीज नसल्याने अंधार आणखीनच गडद झाल्याचे चित्र जिल्हा परिषदेत दिसून येत आहे. दिवसभर जिल्हा परिषदेच्या सर्वच विभागांत अंधार असल्याने अधिकारी व कर्मचार्‍यांनी कार्यालय सोडणेच पसंत केले. कार्यालयातील पंखा, कुलर व संगणकही बंद असल्याने सर्वच विभागांचे कामकाज दिवसभर ठप्प झाल्याचे दिसून येत होते.

Back to top button