

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा: पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिकांना घरपोच मिळकतकराची बिले पोस्ट कार्यालयामार्फत पाठविण्यात आली आहेत. मात्र, अनेक नागरिकांना ती मिळाली नसल्याच्या तक्रारी कायम आहेत. त्यामुळे बिलाचे प्रत्यक्ष वाटप झाले किंवा नाही यांचा शोध कर संकलन विभागाकडून घेतला जात आहे. पालिकेच्या विभागीय कर संकलन कार्यालयाच्या वतीने दरवर्षी मिळकतकराची बिले घरोघरी दिली जातात. मात्र, छपाई व वितरण व्यवस्थेच्या दिरंगाईमुळे अनेकांना नोव्हेंबर व डिसेंबर महिन्यात बिले मिळतात. त्यामुळे नागरिक बिले भरण्यास टाळाटाळ करीत असल्याचे चित्र होते.
त्यामुळे सन 2022-23 वर्षांपासून बिले पोस्टाने घरोघरी वाटण्याचा निर्णय घेण्यात आला. शहरात एकूण 5 लाख 71 हजार मिळकतींची नोंद आहे. एका बिलासाठी 3 रूपये 20 पैसे दराने पुणे पोस्ट कार्यालयास 18 लाख 27 हजार 200 रूपये शुल्क आगाऊ देण्यात आले.
कर संकलन विभागाने तातडीने बिले छापून घेऊन ती पोस्टाला उपलब्ध करून दिली. शहरातील नागरिकांना मिळकतकराची सर्व बिले मे महिन्याच्या अखेरपर्यंत वाटण्यात आल्याचा दावा पोस्टाने केला आहे.
मात्र, शहरातील काही भागांत अद्याप बिलच मिळाल्या नसल्याच्या तक्रारी येत आहेत. त्याबाबत कर संकलन कार्यालयाकडे विचारणा केली जात आहे. त्या नागरिकांना बिलाची प्रिन्ट काढून दिली जात आहे. घरोघरी प्रत्यक्ष मिळकतकराच्या बिलाचे वाटप झाले किंवा नाही यांचा शोध कर संकलन विभागाकडून घेण्यात येत आहे. त्याबाबत सर्व 17 विभागीय कार्यालयाकडून अहवाल मागितला आहे. काही भागात व्यवस्थितपणे बिलाचे वाटप झाल्या नसल्याच्या तक्रारी आहेत, असे सहायक आयुक्त नीलेश देशमुख यांनी सांगितले.