कोल्हापूर : पोलीस नाईकास लाच घेताना रंगेहाथ पकडले | पुढारी

कोल्हापूर : पोलीस नाईकास लाच घेताना रंगेहाथ पकडले

इचलकरंजी, पुढारी वृत्तसेवा : दाखल असलेल्या गुन्ह्यात मदत करण्यासाठी चार हजार रुपयांची लाच स्वीकारताना शहापूर पोलीस ठाण्यातील एका पोलीस नाईकास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. ही कारवाई गुरूवारी (दि.३०) रोजी सकाळी अकराच्या सुमारास कोरोची येथे करण्यात आली. कारवाईमुळे शहापूर पोलीस ठाणे व शहरातील शासकीय कार्यालयांमध्ये खळबळ उडाली. पोलीस नाईक पांडुरंग लक्ष्‍मण गुरव (रा. हळदकर बंगला, खानापूर ता. भुदरगड जि. कोल्हापूर, मुळगाव पिरळ ता. राधानगरी) असे त्याचे नाव आहे.

संगमनगर तारदाळ येथे दीड महिन्यापूर्वी ३२४ चा गुन्हा घडला होता. त्यानुसार तक्रारदार यांच्या आईविरुद्ध शहापूर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झाला होता. त्या गुन्ह्यांमध्ये मदत करण्यासाठी पोलीस नाईक पांडुरंग लक्ष्‍मण गुरव यांनी तक्रारदारांकडे चार हजार रुपयांची मागणी केली होती. याबाबत तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली.

यानंतर पोलीस नाईक पांडुरंग गुरव यांने गुरुवारी सकाळी तक्रारदारास पैसे देण्यासाठी कोरोची येथे बोलाविले होते. त्यानुसार पथकाने या ठिकाणी सापळा रचून चार हजार रुपयांची लाच स्वीकारताना त्याला रंगेहाथ पकडले.

ही कारवाई पोलीस निरीक्षक सतीश मोरे, सफौ संजीव बंबरगेकर, पोहेकॉ अजय चव्हाण, पोना विकास माने, पोना सुनिल घोसाळकर, पोना नवनाथ कदम, पोकॉ मयूर देसाई यांनी केली आहे.

Back to top button