

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : कोरोना संसर्गाचा नवीन व्हेरियंट ओमायक्रॉन संदर्भात घाबरण्याची गरज नाही, परंतु काळजी घेत कोरोनाच्या नवीन व्हेरियंटपासून सावध राहण्याची आवश्यकता आहे, असे आवाहन दिल्ली एम्सचे संचालक डॉ. रणदिप गुलेरिया (Dr Randeep guleria) यांनी केले आहे. कोरोना महारोगराई संपली नसली तरी, देश चांगल्या स्थितीत आहे.
देशातील मोठ्या लोकसंख्येला कोरोना विरोधी लस लावण्यात आली आहे. मात्र, तरी कोरोना बाधितांची संख्या वाढत आहे.
अश्या स्थितीत कोरोना नियमांचे पालन करने, भौतिक दूरत्व ठेवणे, मास्क घालणे तसेच गर्दी टाळली पाहिजे असे गुलेरिया म्हणाले. ओमायक्रॉन सौम्य व्हेरियंट आहे हे आकडेवारीवरून समोर आले आहे.
या व्हेरियंट मुळे रुग्णांच्या ऑक्सिजन पातळीत घट होत नाही. ऑक्सिजन जी आवश्यकता त्यामुळे जास्त राहत नाही. अशात सर्वांनी ऑक्सिजन सिलेंडर तसेच औषधे आवश्यकता नसताना वापरू नये, असे आवाहन त्यांनी केले.
कोरोनाच्या संभावित लाटेचा सामना करण्यासाठी देश तयार आहे. नागरिकांनी न घाबरता सतर्क राहून संसर्ग पसरवणाऱ्या साखळीचा भाग बनू नये, असे आवाहन डॉ. गुलेरिया यांनी केले.