Kolhapur News : शिरोळ तालुक्यात वळीव पावसाची दमदार हजेरी | पुढारी

Kolhapur News : शिरोळ तालुक्यात वळीव पावसाची दमदार हजेरी

जयसिंगपूर, पुढारी वृत्तसेवा : शिरोळ तालुक्यात अनेक ठिकाणी बुधवारी (दि.17) सायंकाळी चारच्या सुमारास वळीव पावसाने दमदार हजेरी लावली. अचानक आलेल्या पावसाने नागरिकांना सुख:द धक्का दिला. मात्र, शिरोळच्या आठवडी बाजारात व्यापारी, भाजी विक्रेते आणि ग्राहकांची तारांबळ उडाली. तसेच वीट भट्टीवरील कामगारांची मोठी धावपळ झाली. (Kolhapur News)

गेल्या काही दिवसापासून वातावरणात उष्म्याचे प्रमाण अधिक जाणवत होते. उष्माने नागरिकांच्या अंगाची लाही-लाही होऊन जीव कासावीस होत होता. तर, अति उष्म्यामुळे नागरिक हैराण झाले होते. त्यामुळे एखादा वळीव पाऊस पडावा अशी अपेक्षा नागरिकांची होती. बुधवारी अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांना सुख:द धक्का मिळाला.

बुधवारी सकाळपासूनच हवेत अधिक उष्मा जाणवत होता. सायंकाळी चारनंतर गारपिटाबरोबरच वादळी वाऱ्यासह वळीव पावसाने दमदार हजेरी लावली. यामुळे काही काळ गारवा निर्माण झाला होता. जयसिंगपूर, शिरोळ, कुरुंदवाड, दानोळी, उदगाव, नांदणी परिसरात अचानक आलेल्या पावसामुळे सर्वांना दिलासा मिळाला. तर शिरोळ शहरातील श्री बुवाफन मंदिरासमोर भरणाऱ्या आठवडी बाजारातील भाजी विक्रेते, व्यापारी, ग्राहकांची अक्षरशः तारांबळ उडाली होती. पाऊस होणे गरजेचे असल्यामुळे पहिल्यांदा पडलेल्या वळीव पावसाचा आनंद सर्वांनी घेतला. बालचमुने रस्त्यावर येऊन पावसात भिजत-नाचत पावसाचे स्वागत केले.

पावसामुळे ऊस, मक्का, हंगामी भाजीपाला यांना पाऊस पोषक ठरला आहे. तर हरभरा, ज्वारी, गव्हाची मळणी झाली असल्यामुळे शेतकऱ्यांची चिंता मिटली होती. त्यामुळे पावसाच्या प्रतीक्षेत असणाऱ्या सर्व शेतकऱ्यांनी आज झालेल्या पावसामुळे समाधान व्यक्त केले. (Kolhapur News )

हेही वाचा :

Back to top button