वाशिम: किन्हीराजा गावाजवळ ट्रक उलटून चालक ठार | पुढारी

वाशिम: किन्हीराजा गावाजवळ ट्रक उलटून चालक ठार

वाशिम: पुढारी वृत्तसेवा : छत्रपती संभाजीनगर – नागपूर महामार्गावरील किन्हीराजा येथे ट्रक उलटून झालेल्या अपघातात चालक ठार झाला. ही घटना आज सकाळी ६ वाजता किन्हीराजा गावाजवळील मालेगाव रोडवर बंजारा धाब्या जवळ घडली. शहा शादुल्ला मस्थान शहा (वय ५५) असे मृत चालकाचे नाव आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, वर्धा येथून लोखंडी टीनपत्रे घेवून ट्रक (एमएच. ४० सीडी ३३१२) कारंजाकडून किन्हीराजा मार्गे मालेगाव, जालना, बीडकडे जात होता. किन्हीराजा गावापासून थोड्या अंतरावर ट्रकच्या समोर रोहीचा कळप आडवा आला. रोही वन्य प्राण्यांना वाचविण्याच्या नादात ट्रक पलटी झाला. यावेळी ट्रकमधील लोखंडी टीनपत्राचे गठ्ठे चालकाच्या अंगावर येवून पडले. त्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला. पुढील तपास जऊळका पोलीस स्टेशनचे ठाणेदार राठोड करत आहेत.

हेही वाचा 

Back to top button