Blind Self Help Group : अंध बांधवांना मिळाला ‘रोजगारा’चा प्रकाश! गडहिंग्‍लजमधील ‘दीपस्तंभ’ची डाेळस भरारी | पुढारी

Blind Self Help Group : अंध बांधवांना मिळाला 'रोजगारा'चा प्रकाश! गडहिंग्‍लजमधील 'दीपस्तंभ'ची डाेळस भरारी

पुढारी ऑनलाईन : साेनाली जाधव

राज्यातील पहिला अंध बचत गट स्थापन करत कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लज तालुक्यातील ‘अत्याळ’ या छोट्याश्या गावात नेत्रदान चळवळीतून नवा इतिहास रचला गेला आहे.  ‘दीपस्तंभ’ बचत गटाकडून दृष्टीहिनांच्या हाताला काम देत त्या हातांना आर्थिकदृष्ट्या सक्षम केलं जात आहे. हा बचत गट राज्यातील अंधाचा पहिला बचत गट ठरला आहे; पण तुम्हाला माहित आहे का? दृष्टीहिन बांधवांचा राज्यातील पहिला बचत गट कसा स्थापन झाला? जाणून घेवूया.नेत्रदान चळवळ ते राज्यातील ‘अंधाचा पहिला बचत गट’ या प्रवासाविषयी  (Blind Self Help Group)

Blind Self Help Group

दृष्टीहिनांचा राज्यातील पहिला बचत गट

गट-तट विसरत नेत्रदानाला सुरुवात

कोल्हापुरपासुन ६५ किलोमीटरवर अंतरावर असलेल्या गडहिंग्लज तालुक्यामधील छोटसं गाव ‘अत्याळ’. याच गावात अकरा वर्षापूर्वी नेत्रदान चळवळीचा पाया घातला गेला. वर्ष हाेते २०१२, महिना ऑक्टोबर, तारीख २९ रोजी नेत्रदानाचा वसा या गावाने उचलला आणि दिवसेंदिवस या चळवळीचा परीघ विस्तारत गेला. सध्या ही चळवळ गडहिंग्लजमधील सात गावात प्रत्यक्षरीत्या काम करत आहे. या सात गावांसह आजुबाजूची काही गावे देखील यात सहभागी होताना दिसत आहेत. २०१२ ते २०२३ दरम्यान तब्बल ९६ लोकांनी या चळवळीतून नेत्रदान केले आहे.

Blind Self Help Group : चळवळीच्या दुसऱ्याच दिवशी नेत्रदान…

आजही काही जन्मजात तर काही अपघाताने आलेल्या अंधत्वावर मात करत ही सृष्टी पाहण्यासाठी धडपड करत असतात. नेत्रदान करण्यास लोक पुढे आली तर नक्कीच या लोकांचही आयुष्य जगणं समृद्ध होईल, या सामाजिक विचाराने, निरपेक्ष भावनेने अत्याळ गावाने अंतर्गत गट-तटासह सर्व राजकीय, सामाजिक, आर्थिक भेद विसरत नेत्रदानाला सुरुवात केली. या नेत्रदानाच्या संकल्पपत्राचे वितरण ज्‍येष्‍ठ कामगार नेते ॲड. गोविंद पानसरे यांच्या हस्ते हाेते. नेत्रदानाचा इरादा केला आणि शब्दांना कृतीची जोड देत पहिले पाऊल माजी सरपंच जयसिंग पाटील यांनी टाकले. त्यांची आई श्रीमती पद्मावती पाटील यांचे निधन झाले. जयसिंग पाटील यांनी आपल्या आईचे नेत्रदान केले.

अत्याळ गावातील नेत्रदानाच्या संकल्पपत्राचे वितरण प्रसंगी ज्येष्ठ कामगार नेते ॲड. गोविंद पानसरे.

Blind Self Help Group : राज्यातील पहिलाच बचत गट, ‘दीपस्तंभ’…

निरपेक्ष आणि सामाजिक भावनेतून सुरु केलीली चळवळीतून आणखी एक विधायक बाब म्हणजे दृष्टीहिन लोकांच्या हाताला काम देण्याच ठरलं. राज्यातील दृष्टीहिनांचा पहिल्या बचत गटाच्या कार्याला सुरुवात झाली.  दीपस्तंभ स्वयंसहायता समूह या नावाने राज्यातील पहिलाच अंधांचा बचत गट तयार करण्यात आला. या निर्णयाने चळवळीतील लोकांनी लोकांसमोर एक आदर्श निर्माण केला.

Blind Self Help Group
बचत गटातील लोकांना प्रशिक्षण देवून त्यांच्या हाताला काम दिले….

बचत गटातील लोकांना एलईडी बल्ब, चार्जिंग बल्ब, लायटिंग माळा, सोलरच्या वस्तू तयार तयार करणे आदीचे प्रशिक्षण दिले गेले. यासाठी त्यांची प्रशिक्षण कार्यशाळा घेतली गली. केलेल्या वस्तू विकून त्यांना आर्थिक बळ मिळावं आणि त्यानांही रोजगाराचे प्रात्यक्षिक मिळावे म्हणून गडहिंग्लज कचेरी मार्गावर दृष्टिहिनांचे रोजगार केंद्र सुरू केले. पंचायत समितीने त्यासाठी जागा उपलब्ध करुन देत सहकार्य केले आहे. सध्या बचत गटात सहा  दृष्टिहिन आहेत; पण तर अंधांच्या रोजगार केंद्रावर आठ दृष्टिहिन काम करीत आहेत. यांनी तयार केलेले उत्पादन ‘दीपस्तंभ’ या बँडखाली विक्री केली जात आहे. दीपस्तंभमुळे यांना रोजगार मिळालाच आहे त्यासह ते स्वावलंबी बनले आहेत. त्यांच्या जगण्याला एक नवी दिशा मिळाली आहे.

राज्यातील पहिला अंध बचत गट

‘मी’ ऐवजी ‘आम्ही’, ‘झिरो बॅलन्स’….

2012 मध्ये सुरु केलेली ही चळवळ आज विस्तारतं आहे. त्यापाठीमागे असलेली कृतीशील रचना. या नेत्रदान  चळवळीची कोणतीही समिती नाही. व्यक्ती, संस्था या पारंपरिक साच्याला फाटा देऊन पदांची उतरंड व्यवस्थेला फाटा देत गावातील प्रत्येक व्यक्ती हा ‘कार्यकर्ता’ हेच सर्वोच्च पद तयार केले आहे. यामुळे श्रेयवादाचा मुद्दाच बाजूला पडला आणि आपण सारे एक आहोत, ही भावना वाढीस लागत आहे. ‘झिरो बॅलेन्स’ हे धोरण ठेवत आगाऊ देणगी गोळा करण्याऐवजी गरजेवेळी व गरजेइतकीच देणगी स्वीकारली जाते. चळवळीच्या खात्यावर एकही रुपया शिल्लक राहणार नाही, याची काळजी घेतली जाते. चळवळीच्या कोणत्याही कार्यक्रमादरम्यान व्यासपीठावर  वरिष्ठ आणि कनिष्ठ हा भेदभाव बाजूला सारत केवळ प्रमुख पाहुण्यांची खुर्ची व्यासपीठावर असते. नेत्रदात्यांच्या कुटुंबीयांचाच गौरव केला जातो. आतापर्यंत चळवळीतील कोणत्याही कार्यकत्यनि एकही सत्कार स्वीकारलेला नाही. प्रथम आपले कुटुंब, त्यानंतर नोकरी-व्यवसाय आणि त्यानंतर शिल्लक राहिलेला वेळ चळवळीसाठी द्यावा, अशी माफक अपेक्षा असलेली ही चळवळ विस्तारत आहे.

या चळवळीतील ‘कार्यकर्ते’ सांगतात, “चळवळीतील कोणीही  ‘मी’पणाला स्थान देत नाही. चळवळीतील प्रत्येकजण ‘मी’ ऐवजी ‘आम्ही’ला महत्त्व देतो. अनेक ‘मी’ जोडल्यानंतर ‘आम्ही’ तयार होतो. हाच या चळवळीचा आत्मा आहे. प्रत्येक कार्यकर्त्याने हा आत्मा जपला आहे. त्यामुळेच अनेक अडचणींवर मात करीत चळवळीचा जिवंतपणा टिकून आहे.”

गावनिहाय नेत्रदान…

अत्याळ गाव आणि आजुबाजूच्या गावामध्ये आतापर्यंत तब्बल ९६ लोकांचे मरणोत्तर नेत्रदान झाले आहे. वर्षागणिक चळवळीचा परीघ विस्तारत आहे. सध्या गडहिंग्लज आणि आजरा तालुक्यात चळवळीचे काम सुरू आहे. गावानूसार पुढीलप्रमाणे नेत्रदान झाले आहे.  अत्याळ (३३), बेळगुंदी (१३), ऐनापूर (१०), कौलगे (७), गडहिंग्लज शहर (६), सरोळी (३), करंबळी (४), भडगाव (४), नूल (३), शिप्पूर तर्फ आजरा (२), उत्तूर (२),  शेंडूर (१), बामणे (१), उंबरवाडी (१), हिरलगे (१), लिंगनूर कसबा नूल (१), बामणे (१), इंचनाळ (१), गिजवणे (१), कडगाव (१).

या बचत गटातील अंध महिला सदस्य रेश्मा उंडाळकर सांगतात, “महागाव ते गडहिंग्लज असा प्रवास करत गडहिंग्लज मधील रोजगार केंद्रात काम करतो. या केंद्रामुळे आमच्या हाताला काम मिळालं. आम्ही आर्थिकदृष्ट्या सक्षम झालो. हे काम करायलो लागलो तेव्हापासून आत्मविश्वास आला, मानसिक बळ मिळालं. हाताला काम नव्हते तेव्हा एक प्रकारचा मानसिक ताण-तणाव होता. दिवसभर काय करायचा हा प्रश्न होता; पण हे बचत गटात करायला लागलो तेव्हापासून दिवस कामामुळे हसत-खेळत जातो.

हेही वाचा 

Back to top button