नेत्रदान का करावे? जाणून घ्या अधिक | पुढारी

नेत्रदान का करावे? जाणून घ्या अधिक

डोळे शरीरातील अतिशय महत्त्वाचे इंद्रिय आहेत. ‘डोळ्यांचे आरोग्य सर्वांसाठी’ या ब्रीदवाक्य असलेल्या राष्ट्रीय अंधत्व नियंत्रण कार्यक्रमांतर्गत डोळ्यांच्या आजाराबद्दल जनजागृती करणे आणि आरोग्य उपचारासाठी निगडित पायाभूत सुविधांचा विकास करणे यासाठी काम केले जाते.

डोळे मानवी शरीरातील अतिशय महत्त्वाचे इंद्रिय आहे. मात्र, काही जणांना जन्मतः तर काही जणांना अपघातामुळे डोळ्यांपासून वंचित राहावे लागते. द़ृष्टिदानाचे महत्त्व व स्मरण राहावे यासाठी 10 जून हा द़ृष्टिदान दिन म्हणून साजरा केला जातो. 10 ते 16 जून हा सप्ताह द़ृष्टिदान सप्ताह म्हणूनही साजरा केला जातो.

अंधत्व टक्केवारी कमी करण्यासाठी प्रयत्न

महाराष्ट्र राज्य शासनाने अंधत्व नियंत्रणासाठी विविध योजना हाती घेतल्या आहेत. 1976 पासून राष्ट्रीय अंधत्व नियंत्रण कार्यक्रम सुरू करण्यात आला आहे. 2017 मध्ये या कार्यक्रमास राष्ट्रीय अंधत्व आणि द़ृष्टिक्षीणता नियंत्रण कार्यक्रम करण्यात आले आहे. केंद्र सरकारच्या धोरणानुसार 2025 पर्यंत अंधत्वाचे प्रमाण 0.25 टक्केपर्यंत कमी करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. मोतिबिंदू शस्त्रक्रियेबरोबरच काचबिंदू, मधुमेह रेटीनोपॅथी, लहान मुलांमधील अंधत्वावर उपचार करण्यावरदेखील लक्ष केंद्रित करण्यात आले आहे.

केंद्र राज्य सहकार्याने कार्यक्रम

राष्ट्रीय अंधत्व नियंत्रण कार्यक्रमासाठी केंद्र सरकारकडून 100 टक्के अनुदान देण्यात येत होते. पण 2015-16 पासून केंद्र सरकार साठ टक्के तर राज्य शासन 40 टक्के वाटा देते. यातून डोळ्यांच्या उपचारासाठी उच्च दर्जाची सेवा उपलब्ध करून देणे, शालेय विद्यार्थ्यांमधील द़ृष्टिदोष शोधून काढणे, डोळ्यांच्या आजाराबद्दल जनजागृती करणे ही कार्यक्रमाची ठळक वैशिष्ट्ये आहेत.

नेत्र आरोग्यासाठी सुविधा

राष्ट्रीय अंधत्व नियंत्रण कार्यक्रमांतर्गत मोतीबिंदू शस्त्रक्रिया सुविधा प्रत्येक जिल्ह्यात उपलब्ध झाल्या असून द़ृष्टिदोष निवारण्यासाठी राज्य शासनाच्या वतीने मोफत चष्म्याची व्यवस्था करण्यात आली आहे. अंधत्व प्रतिबंध होण्यासाठी द़ृष्टीने या केंद्राच्या माध्यमातून नेत्र शल्यचिकित्सक, नेत्रचिकित्सा अधिकारी, ऑप्टोमेट्रीस्ट अशा विविध तज्ज्ञांच्या माध्यमातून नेत्र आरोग्यसेवा अधिक सक्षम करण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. राज्यात सुमारे 69 नेत्रपेढ्या, 77 नेत्र संकलन केंद्र, 167 नेत्र प्रत्यारोपण केंद्र कार्यरत आहेत. राज्यात 98 शासकीय नेत्र शस्त्रक्रिया गृह कार्यान्वित आहेत.

उद्दिष्ट साध्य करण्यासाठी अर्थसहाय्य

डोळ्यांचे आरोग्य चांगले राहावे यासाठी आणि नेत्रदानाबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी अर्थसहाय्य दिले जाते. त्यामध्ये मोतीबिंदू शस्त्रक्रिया वाढवणे, जनसहभाग, आरोग्य सेवांचे बळकटीकरण करणे, शालेय विद्यार्थ्यांना मोफत चष्मे वाटप यांचा समावेश आहे. चाळीस वर्षांवरील व्यक्तींची मोफत वैद्यकीय तपासणी करणे, दान केलेली बुब्बुळे जमा करून नेत्र प्रत्यारोपण करणे, नेत्रदानबाबत पायाभूत सुविधा विकसित करणे यासाठीही अर्थसहाय्य दिले जाते.

नेत्रदानासाठी आर्थिक मदत

नेत्रदान करण्यासाठी लोकांनी जागरूक होण्याची आवश्यकता आहे. अलीकडे अनेक नागरिकांनी नेत्रदान करण्याबाबत तयारी दर्शविली आहे. समाजात एक सकारात्मक बदल होत आहे. नेत्रदानाबाबत लोक चळवळ निर्माण झाली पाहिजे. नेत्र प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करण्यासाठी राज्य शासनाच्या वतीने पायाभूत सुविधा विकसित केल्या जात आहेत. त्याचबरोबर आर्थिक मदत दिली जात आहेे. एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याचे नेत्र दान केले जाऊ शकतात. नेत्रदान करणे हे मृत व्यक्तीच्या किंवा कुटुंबातील सदस्यांच्या इच्छेवर अवलंबून असते.

नेत्रदान का करावे?

  • मृत्यू पावणारा एक व्यक्ती आपल्या दोन डोळ्यांनी दोन द़ृष्टिहीन व्यक्तींना द़ृष्टी देऊ शकतो.

नेत्रदान कोण करू शकते?

  • कोणतीही व्यक्ती कोणत्याही वयात नेत्रदान करू शकते
  • उच्च रक्तदाब, मधुमेह, अस्थमा इत्यादी आजार असलेल्या व्यक्तीदेखील नेत्रदान करू शकतात.
  • चष्मा लावणारे व मोतीबिंदूचे ऑपरेशन झालेल्या व्यक्तीसुद्धा नेत्रदान करू शकतात.

नेत्रदानाची प्रक्रिया

  • नेत्रदान करण्यासाठी आपल्या जवळील आय बँकेचा नंबर किंवा 1919 डायल करा
  • आपण संपर्क साधताच आय बँकेमधून एक ग्रुप मृत व्यक्तीच्या घरी कार्निया घेण्यासाठी पोहोचतील.
  • डोळ्यांमधून कार्निया मृत्यूनंतर सहा तासांच्या आत काढून घेतले पाहिजे

नेत्रदान करण्यापूर्वी घ्यावयाची खबरदारी

आय बँकेतून येणार्‍या पथकापूर्वी मृत शरीर ठेवले आहे त्या जागी असलेला पंखा बंद करावा, डोक्याखाली उशी ठेवावी आणि डोळ्यांना ओल्या कापसाने किंवा बर्फाने झाकावे.

– रवींद्र राऊत

Back to top button