मराठा आरक्षणासाठी मुरगूड येथे रास्ता रोको आंदोलन; वाहतूक विस्कळीत | पुढारी

मराठा आरक्षणासाठी मुरगूड येथे रास्ता रोको आंदोलन; वाहतूक विस्कळीत

मुदाळतिट्टा; पुढारी वृत्तसेवा : मराठा आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं, एक मराठा कोटी मराठा, या सरकारचं करायचं काय… , मराठा आरक्षण मिळालेच पाहिजे, अशा घोषणा देत मुरगूड (ता. कागल) येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. या रास्ता रोकोमुळे काही काळ वाहतूक व्यवस्था कोलमडली. रास्ता रोको आंदोलनामध्ये सर्व समाजातील समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

संबंधित बातम्या 

मुरगूड शहरातील तमाम मराठा बांधव शिवतीर्थावर आज गुरूवारी (दि. १९) रोजी सकाळी एकत्र जमले होते. यावेळी आंदोलन कर्त्याकडून शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची पूजा करण्यात आली. यावेळी सर्व मराठा बांधवांना पाठिंबा देण्यासाठी सर्व समाजातील नागरीक एकवटले. सदरचा मराठा मोर्चा शिवतीर्थपासून एस.टी स्टँड मार्गे बाजारपेठ, राणा प्रताप चौक ते नाका नंबर एक येथील निपाणी फोंडा या राजमार्गावर येत आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात सरकारविरोधी जोरदार घोषणादेखील देण्यात आल्या.

यावेळी स्वागत मयूर सावर्डेकर यांनी केले. प्रास्ताविक ओंकार पोतदार यांनी केले. यानंतर चंद्रकांत जाधव, सुहास खराडे, जगन्नाथ पुजारी, दगडू शेणवी, दत्ता पाटील केनवडे, जयसिंग भोसले, सुखदेव येरूकर, विक्रांत साळुंखे, सुशांत भोसले आदी कार्यकर्त्यांनी मनोगत व्यक्त केली.

यावेळी मोर्चामध्ये सहभागी माजी नगराध्यक्ष नामदेवराव मेंडके, सर्जेराव भाट, राहुल वंडकर, राजेंद्र चव्हाण, युवराज सूर्यवंशी, दीपक परीट, दत्तात्रय मंडलिक, अभिजीत मिटके यांच्यासह विविध समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून चोख पोलीस तैनात करण्यात आला होता. मुरगूड शहरातील नित्य नियमाचा व्यवहार सुरळीत सुरू होता.

हेही वाचा : 

Back to top button