आमदारांच्या गावातही निवडणुकीसाठी चुरस | पुढारी

आमदारांच्या गावातही निवडणुकीसाठी चुरस

सुषमा नेहरकर-शिंदे

पुणे : संपूर्ण खेड तालुक्याचे लक्ष असलेले आमदार दिलीप मोहिते-पाटील यांच्या पिंपळगाव तर्फे खेड ग्रामपंचायत निवडणुकीतदेखील यंदा प्रचंड चुरस पाहायला मिळत आहे. यामध्ये दौंडकर विरुद्ध मोहिते हा संघर्ष अटळ असून, ग्रामपंचायत निवडणुकीची सत्रे गावातील तरुण पिढीच्या हातात एकवटताना दिसत आहेत.आमदार दिलीप मोहिते-पाटील व माजी पंचायत समिती सदस्य सोमनाथ दौंडकर यांनी लक्ष घातले, तरी ही निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता कमी झाली आहे. खेड तालुक्यातील मोठी व तालुक्याच्या राजकारणावर प्रभाव असणारी ग्रामपंचायत म्हणून पिंपळगाव तर्फे खेड ग्रामपंचायतीकडे पाहिले जाते.

त्यात थेट जनतेतून सरपंचपद या वेळी खुल्या पुरुषासाठी राखीव असल्याने निवडणुकीत चुरस प्रचंड वाढली आहे. पिंपळगाव ग्रामपंचायतीत 13 सदस्य व एक सरपंच अशा पाच वॉर्डमध्ये ही निवडणूक होणार आहे. पिंपळगाव तर्फे खेड ग्रामपंचायतीत दौंडकर, मोहिते, पोतले, थिटे, गाडे, सोनवणे, गायकवाड या भावकी गावकीचे राजकारण असले, तरी आतापर्यंत खरी लढत ही दौंडकर विरुद्ध मोहिते अशीच होत आली आहे. गावांमध्ये हेच दोन गट एकमेकांच्या विरोधातदेखील लढत आले आहेत. परंतु गेल्या अनेक वर्षांपासून आमदार दिलीप मोहिते-पाटील यांच्याच ताब्यात ग्रामपंचायतीचा कारभार राहिला आहे. त्यात मागील निवडणुकीपासून दौंडकरांचा एक गट आमदार दिलीप मोहिते-पाटील यांच्याकडे सामिल झाल्याने आमदाराची ताकद वाढली असून, आमदारांनी लक्ष घातल्यास निवडणूक बिनविरोध होऊ शकते असे जाणकारांना वाटते.

परंतु निवडणुकीसाठी इच्छुकांची प्रचंड संख्या व काहीही झाले तरी निवडणूक लढवायचीच या भूमिकेत असलेले तरुण रक्त आमदार व गावातील ज्येष्ठांचे कितपत ऐकतील याबाबत शंकाच आहे. यामुळेच आमदार दिलीप मोहिते-पाटील यांच्या गावांतदेखील ग्रामपंचायत निवडणुकीत प्रचंड चुरस निर्माण झाल्याचे स्पष्ट होते.

सरपंचपदाची माळ कुणाच्या गळ्यात
खेड तालुक्यातील महत्त्वाचे व साडेतीन चार हजार मतदार असलेल्या ग्रामपंचायतीचे थेट जनतेतून व पाच वर्षांसाठी असलेले सरपंचपद मिळविण्यासाठी डझनभर उमेदवार इच्छुक आहेत. त्यात दिलीप मोहिते-पाटील यांनीच ताकद दिल्याने अनेकजणांचे ’प्लॉटिग’ व अन्य व्यवसायात प्रचंड भरभराट झाली आहे. यामुळेच निवडणुकीत राजकीय व आर्थिक गणितदेखील वाढले आहे. यामध्ये इच्छुक उमेदवारांमध्ये सध्या तरी माजी उपसरपंच गणेश दौंडकर, आमदार पुतणे रोहन मोहिते, रावसाहेब दौंडकर, मधुकर दौंडकर, माजी उपसरपंच शरद मोहिते, माजी सदस्य जालिंदर इंगळे, निखिल मोहिते आदी अनेक चेहरे इच्छुक आहेत. यापैकी आमदार कुणाला पाठिंबा देतात, या सर्वांमध्ये समन्वयक साधून एक चेहरा निश्चित करतात व अण्णांचा शब्द अंतिम मानून थांबण्याची तयारी कोण दाखविणार यावर पिंपळगाव तर्फे खेड ग्रामपंचायत निवडणुकीची राजकीय गणित निश्चित होणार आहे. यामुळेच या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.

हेही वाचा :

Back to top button