Pimpri News : बेकायदा प्रवासी वाहतूक; आरटीओची कारवाई | पुढारी

Pimpri News : बेकायदा प्रवासी वाहतूक; आरटीओची कारवाई

पिंपरी; पुढारी वृत्तसेवा : वाहतुकीच्या नियमांची पायमल्ली करत, प्रवासी वाहतूक करणार्‍या ट्रॅव्हल्स गाड्यांवर पिंपरी-चिंचवड प्रादेशिक परिवहन विभागाकडून कारवाई करण्यात आली. गेल्या नऊ महिन्यांत 1 कोटी 8 लाख रुपयांचा दंड या ट्रॅव्हल्स कंपन्यांकडून वसूल करण्यात आला आहे. औद्योगिक नगरी असलेल्या पिंपरी-चिंचवड शहरात शिक्षण तसेच रोजगासाठी येणार्या नागरिकांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे.

मात्र स्वतःच्या गावी जाऊन आपल्या कुटुंबियांसोबत सण-उत्सव साजरे करण्यासाठी अनेक नागरिक आपल्या गावी जात असतात. सण-उत्सवात रेल्वे आणि बस या सार्वजनिक वाहतुकीचे आरक्षण फुल्ल होत असल्याने प्रवासी खासगी ट्रॅव्हल्सचा पर्याय निवडतात. त्यामुळे या गोष्टीचा गैरफायदा घेत ट्रॅव्हल्स कंपन्या अव्वाच्या सव्वा भाडे आकारतात, गाडीमध्ये क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी कोंबून तसेच परवानगी नसताना देखील टपावरून मालाची वाहतूक केली जात आहे.

अशा प्रकारे वाहतुकीच्या नियमांकडे दुर्लक्ष करणार्‍या ट्रॅव्हल्स गाड्यांवर गेल्या नऊ महिन्यांत मोठी कारवाई करीत आरटीओने दंड वसूल केला आहे. जानेवारी ते सप्टेंबर 2023 दरम्यान प्रादेशिक परिवहन कार्यालय, पिंपरी-चिंचवडमार्फत एकूण 2622 बसेसची तपासणी करण्यात आली. यामध्ये 1003 वाहने दोषी आढळून आली आणि एकूण 1 कोटी 8 लाख इतका दंड वसूल केला आहे.

या नियमांकडे दुर्लक्ष केल्यास कारवाई

आसन क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी, प्रथमोपचार पेटी, अग्निशामक यंत्रणा, आपत्कालीन द्वार, रिफ्लेक्टर, परवाना, नोंदणी कागदपत्रे, फिटनेस प्रमाणपत्र आदींची अनुपलब्धता तसेच अवैध मालवाहतूक केल्यास आरटीओंकडून कारवाई करण्यात येते.

आरटीओकडून आवाहन

सुरक्षित प्रवासाच्या दृष्टीने आरटीओच्या वतीने आवाहन केले जाते की, एखाद्या वाहनामधून क्षमतेपेक्षा अधिक प्रवाशांची वाहतुक होत असल्यास कार्यालयाच्या ई-मेल आयडीवर तक्रार करावी. तसेच अशा वाहनातून प्रवास करणे सुरक्षिततेच्या दृष्टीने धोकादायक असल्याने असा प्रवास टाळावा.

आसनक्षमता 39; मात्र प्रवासी भरले 80

पुणे ते इंदौर या मार्गावर शहरामधून बेकायदा होत असलेल्या खासगी ट्रॅव्हल्सवर बुधवार (दि. 18) रोजी आरटीओने कारवाई केली आहे. या वाहनाची आसनक्षमता 39 प्रवाशांची असताना एकूण 80 प्रवासी बसविण्यात आले होते. तसेच वाहतूकीच्या नियमांकडे दुर्लक्ष करीत, पाच टनाहून अधिक लोडींगचे हे वाहन होते. ही कारवाई प्रादेशिक परिवहन कार्यालयच्या वायुवेग पथकातील मोटार वाहन निरीक्षक प्रकाश मुळे, सहा. मोटार वाहन निरीक्षक रविंद्र गावडे व गितांजली काळे यांनी केली.

आरटीओची कारवाई

वाहतुकीच्या नियमांची पायमल्ली करणार्‍या वाहनचालकाची अनुज्ञप्ती निलंबित केली जाते. वाहन नोंदणी, योग्यता प्रमाणपत्र, वाहन परवाना (परमीट) निलंबित केला जातो तसेच दंडही आकारला जातो.

पिंपरी-चिंचवड शहर मोठ्या लोकसंख्येचे शहर आहे. यामध्ये बाहेरगावच्या लोकांची संख्या अधिक आहे. त्यामुळे उपलब्ध खासगी वाहतुकीच्या सोयीमुळे प्रवास करणार्या नागरिकांची संख्या जास्त आहे. खासगी वाहन चालक धोकादायकरित्या बेकायदा वाहतूक करीत आहेत. असा प्रवास नागरिकांनी टाळावा व अशा वाहनांबाबत नागरिकांनी तक्रार करावी.

-अतुल आदे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी,
पिं. चिं. शहर.

हेही वाचा

मनीष सिसोदिया यांना दिलासा नाहीच, न्‍यायालयीन कोठडीत २२ नोव्‍हेंबरपर्यंत वाढ

जयंत पाटील ८ आमदारांसह आमच्या संपर्कात : धर्मरावबाबा आत्राम यांचा दावा

काळजीची बातमी ! ’ऑक्टोबर हिट’ने ओलावा घटला ; रब्बी हंगामातील पेरा घटणार

Back to top button