पावनखिंड : इतिहासकारांना आजही खुणावतेय पावनखिंड रणसंग्रामातील वीरांचे बलिदान… | पुढारी

पावनखिंड : इतिहासकारांना आजही खुणावतेय पावनखिंड रणसंग्रामातील वीरांचे बलिदान...

कोल्हापूर सागर यादव : धो-धो कोसळणाऱ्या धुवाँधार पावसात छत्रपती शिवाजी महाराजांनी पन्हाळगड ला पडलेला सिद्दी जोहरचा करकचून आवळलेला वेढा शिताफिने फोडला. वाऱ्याच्या वेगाने विशाळगडाकडे निघाले. मात्र शिवरायांचा माग काढत सिद्दीच्या सैन्याने त्यांना पन्हाळगड पासून ५० कि.मी. अंतरावर चौकेवाडी येथे गाठलेच. या चौकेवाडीपासून (सध्याचे पांढरेपाणी) शिवछत्रपतींच्या बांदल आणि सिद्दीच्या सैन्यात घनघोर लढाई झाली. भरपावसात रक्ता-मांसाचा चिखल झाला. शत्रूच्या नांग्या ठेचत शिवछत्रपती येथून सहीसलामत बाहेर पडले आणि थेट विशाळगडावर सुखरुप पोहोचले.

हे ही वाचा :

पन्हाळगड ते विशाळगडाच्या रणसंग्रामातील ही विजयश्री इतिहासाच्या पानोपानी सुवर्णाक्षरात कोरली गेली आहे. या महापराक्रमाला दि. १२ व १३ जुलै रोजी ३६१ वर्षे पूर्ण होत आहेत.

स्वराज्याच्या लढ्यातील अजरामर इतिहास ठरलेल्या या रणसंग्रामातील पन्हाळगड ते विशाळगड मार्गावरील फरसबंदी, सह्याद्रीच्या डोंगर-दऱ्यातील खाचखळग्यांच्या वाटा, प्रत्येक दगड-गोटे, जंगल आता स्फूर्तीदायी स्मारक बनले आहेत. मात्र या रणसंग्रामात बलीदान देणाऱ्या शेकडो वीरांच्या समाध्या दुर्दैंवाने दुर्लक्षीत अवस्थेत जर्जर झाल्या आहेत. या वीरांची ओळख पटविण्यासाठी त्या इतिहास संशोधकांना आजही खुणावत आहेत.

१२ व १३ जुलै १६६० या दिवशी पन्हाळगड ते विशाळगड या सह्याद्री पर्वत रांगेतील मार्गावर प्रचंड रणकंदन घडले. शिवछत्रपती व त्यांच्या रयतेच्या स्वतंत्र-सार्वभौम स्वराज्याच्या रक्षणार्थ अनेक मावळ्यांनी आपल्या प्राणांची आहूती दिली.

या जाज्वल्य पराक्रमी इतिहासाच्या स्मृती जपण्याच्या उद्देशाने विविध शिवभक्त-इतिहासप्रेमी संस्था- संघटनांच्यावतीने ‘पन्हाळगड ते पावनखिंड’ या साहसी पदभ्रमंती मोहिमेचे आयोजन केले जाते. मात्र वास्तवात हा स्फूर्तीदायी इतिहास केवळ पदभ्रमंतीपुरताच मर्यादित राहिल्याचे वास्तव आहे. वास्तविक या प्रेरणादायी इतिहासावर व्यापक संशोधनाची गरज आहे.

हे ही वाचा :

वीर शिवा काशिद यांचे बलिदान…

आदिलशहाचा कडवा सरदार सिद्दी जौहरचा पन्हागड ला सुमारे चार महिने पडलेला वेढा शिताफीने फोडून शिवछत्रपतींनी १२ जुलै १६६० रोजी विशाळगडाकडे कूच केली. शत्रु सैन्याला चकवा देण्यासाठी हूबेहूब दिसणार्‍या शिवा काशिद याला पालखीतून मुख्य मार्गावरून पाठविले.

शिवराय स्वत: दुसर्‍या पालखीतून रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत सुरक्षीत निसटले. इकडे शिवा काशीद यांची पालखी शत्रु सैन्याने ताब्यात घेतली. पालखीत शिवराय नसल्याचे समजताच चिडलेल्या सिद्दीने क्षणाचाही विलंब न करता शिवा काशीदांना जागच्या जागी ठार केले.

बांदल सैन्याचा भीम पराक्रम…

शिवछत्रपतींना पडकण्यासाठी लगोलग घोडदळ रवाना झाले. पांढरेपाणी (तत्कालीन चौकेवाडी) येथे या सैन्याने शिवरायांना गाठले. तुंबळ युध्द सुरु झाले. स्वराज्य आणि शिवछत्रपतींंच्या रक्षणासाठी बाजीप्रभू व फुलाजीप्रभु देशपांडे, संभाजी जाधव, विठोजी काटे आणि शेकडो शिवनिष्ठ मावळे जीवाची पर्वा न करता लढले. पांढरे पाणी ते पावनखिंड (तत्कालीन घोडखिंड) सद्याचे भाततळी या सुमारे ६ किलोमिटर परिसरात तुंबळ युध्द झाले.

अखरे शिवछत्रपती विशाळगडावर सहिसलामत पोहचले. बांदल सैन्याचे प्रमुख रायाजी नाईक-बांदल यांच्या नेतृत्वाखाली बाजी व फुलाजी प्रभू देशपांडे, विठोजी काटे, संभाजी जाधव, हैबतराव बांदल अशा अनेक मावळ्यांनी प्राणार्पण केले.

आपल्यासाठी प्राणार्पण करणार्‍या या मावळ्यांचा उचीत सन्मान करण्यासाठी शिवछत्रपतींनी त्यांच्या समाध्या बांधल्या, त्यांच्या मुला-बाळांना स्वराज्यात चाकरी दिली. त्यांच्या कुटूंबीयांच्या उदरनिर्वाहासाठी जमिनी दिल्या.

स्फूर्तीदायी इतिहासाकडे दूर्लक्ष…

इतिहासातील अशा या देदिप्यमान प्रकरणाच्या स्मृती जपण्यासाठी पन्हाळगडावर बाजीप्रभू व शिवा काशीद यांचे पुतळे उभारण्यात आले आहेत. मात्र त्यांची व्यवस्था पाहिजे तशी राखली जात नाही.

या वीरांच्या सामधी स्थळांच्या जतन, संवर्धन व संरक्षणासाठी कोणतीही उपाय-योजना केली जात नाही. विशाळगडावरील बाजी व फुलाजीप्रभू देशपाडे यांच्या समाधी जिर्णोध्दाराची कामे गेली कित्येक वर्षे ‘जैसे थे’ आहेत. पन्हाळगडच्या पायथ्याशी असणाऱ्या शिवा काशिद समाधी स्थळाचे सुशोभिकरण झाले आहे. मात्र याची डागडूजी-रंगरंगोटी होत नसल्याने त्याला अवकळा आली आहे.

हे ही वाचा :

धारकऱ्यांची वारी…

महाराष्ट्राच्या सांस्कृतीक व सामाजिक इतिहासात आषाढी एकादशी निमीत्त पंढरपुराला जाणार्‍या वारकर्‍यांची प्रदिर्घ परंपरा आहे. त्याचप्रमाणे महाराष्ट्राच्या लढवय्या इतिहासातही अशीच एक अलिखीत परंपरा आहे. ही परंपरा म्हणजे ‘पन्हाळगड ते पावनखिंड’ अशी साहसी पदभ्रमंती मोहिम होय.

प्रतिवर्षी या धारकर्‍यांच्या वारीला व्यापक स्वरूप प्राप्त होत आहे. ही वारी महाराष्ट्रापुरतीच मर्यादीत राहिली नसून या वारीला देशभरातून इतिहासप्रेमी-शिवभक्त धारकरी येवू लागल्याने याला राष्ट्रीय स्वरूप प्राप्त होवू लागले आहे.

असा आहे पन्हाळगड ते विशाळगडचा खडतर मार्ग…

इतिहासतील अशा या देदिप्यमान प्रकरणाच्या स्मृती जपण्यासाठी शिवभक्त व इतिहासप्रेमी संस्था संघटनांतर्फे प्रतिवर्षी जुलै महिन्यात पन्हाळगड ते पावनखिंड अशा साहसी पदभ्रमंती मोहिमेचे आयोजन कले जाते.

बोचरा वारा, प्रचंड पाऊस आणि सह्याद्री पर्वत रांगेतील काटे-कुटे, चिखल, दगड -धोंड्यांनी माखलेल्या खडतर डोंगर-दर्‍यांच्या मार्गावरून ही पदभ्रमंती होते.

पन्हाळगडावरून सुरू होणारी ही पदभ्रमंती मोहिम- राजदिंडी मार्गे मसाई पठार- कुंभारवाडी- मांडलाईवाडी- करपेवाडी- आंबेवाडी- माळवाडी- पाटेवाडी- सुकामाचा धनगरवाडा- पांढरेपाणि मार्गे पावनखिंड अशी काढली जाते. सुमारे ७० किलोमीटर आंतराचा हा मार्ग आहे. इतिहाच्या पाऊल खुणा शोधत रणभुमीचे पुजन, वीरांना अभिवादन, शिवछत्रपतींचा अखंड जयघोष, वीरश्री निर्माण करणारे शिवशाहीरांचे पोवाडे, इतिहास तज्ज्ञांचे मार्गदर्शन, शिवकालीन युध्दकलांची प्रात्यक्षीके अशा विविध कार्यक्रमांनी हा खडतर मार्गसुध्दा सुखकर होतो.

मोहिमेत दरवर्षी शेकडो गिर्यारोहकांचा सहभाग…

निरर्व्यसनी, सशक्त, ध्येयवादी, देशप्रेमी युवापीढी निर्माण व्हावी, त्यांच्याकडून इतिहासाचे जतन, संवर्धन आणि संरक्षणाचे कार्य घडावे, तसेच इतिहासाचा अनमोल वारसा भावीपीढीकडे सोपविण्याचे कर्तव्य पार पाडण्यासाठी त्यांनी सज्ज व्हावे अशा उद्देशाने विविध इतिहासप्रेमी, शिवभक्त संस्था संघटनांंकडून प्रतिवर्षी पन्हाळगड ते पावनखिंड या पदभ्रमंतीचे आयोजन केले जाते.

यात सह्याद्री प्रतिष्ठान, हिलरायडर्स, निसर्गवेध परिवार, शिवयोध्दा भूमि मंडळ, वस्ताद आनंदराव पवार प्राचीन युध्दकला प्रशिक्षण केंद्र इचलकरंजी गिरीभ्रमण मंडळ, न्यू हायकर्स, शिवप्रतिष्ठान, शिवराष्ट्र हायकर्स, अल्फाईन समिटर्स, भरारी संस्था मुंबई या व अशा शिवभक्त-इतिहासप्रेमी संस्था-संघटनांचा समावेश आहे.

फरसबंदी मार्गाचे जतन अत्यावश्यक

प्राचीन काळातील व्यापारी मार्ग असणाऱ्या पांढरेपाणी व पावनखिंड परिसरातील फरसबंदी मार्गांचे जतन होणे गरजेचे आहे. बहूतांशी ठिकाणची फरसबंदी शेती व इतर कारणांसाठी नष्ट करण्यात आली आहे. पुरातत्व विभागाने शिल्लक फरसबंदीचे जतन-संवर्धन आणि संरक्षण व्हावे यासाठी तातडीने प्रयत्न करणे अत्यावश्यक आहे.

इंद्रजीत सावंत (इतिहास अभ्यासक)

अपरिचीत मावळ्यांबद्दल सखोल संशोधन व्हावे

पन्हाळगड ते विशाळगड या ऐतिहासिक मार्गावर झालेल्या युध्दात अनेक बांदल-मराठा सैनिक मारले गेले. पण या संदर्भातील इतिहासात केवळ दोन-तीन नावांच्या पलिकडे इतर नावांची माहिती लोकांना नव्हती. अभ्यासकांनी अभ्यास करून संशोधकांनी रायाजी नाईक-बांदल, विठोजी काटे, संभाजी जाधव, हैबतराव बांदल ही नावे प्रकाशात आणली. उर्वरित नावेही माहिती व्हावीत यासाठी व्यापक प्रमाणात प्रयत्नांची गरज आहे.

राम यादव (सदस्य रायगड विकास प्राधिकरण)

हे वाचलत का :

Back to top button