कोल्हापूर: बांबवडेतील महामार्गावरील पाण्याची निर्गत करा; अन्यथा तीव्र आंदोलन: भगतसिंग चौगुले | पुढारी

कोल्हापूर: बांबवडेतील महामार्गावरील पाण्याची निर्गत करा; अन्यथा तीव्र आंदोलन: भगतसिंग चौगुले

सरूड: पुढारी वृत्तसेवा : बांबवडे (ता.शाहूवाडी) येथे कोल्हापूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर पाणी साचून रस्त्याला तळ्याचे स्वरूप प्राप्त होते. ग्रामपंचायत कार्यालय ते चौगुले पेट्रोल पंप या दरम्यान सुमारे २०० मीटर परिसरात अखंड पावसाळाभर साचलेल्या पाण्यातून वाहनांची वर्दळ सुरू असल्यामुळे अनेक लहानमोठ्या अपघातांच्या घटना घडल्या आहेत. यावर उपाय म्हणून राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभागाने रस्त्याकडेला कायमस्वरूपी नाला बांधून वाहनधारकांसह जनसामान्यांची त्रासातून मुक्तता करावी, अन्यथा ग्रामस्थांना सोबत घेऊन तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा बांबवडेचे लोकनियुक्त सरपंच भगतसिंग चौगुले यांनी दिला आहे.

महामार्ग रस्त्याच्या समस्येवर बोलाविलेल्या बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना सरपंच चौगुले यांनी हायवे प्राधिकरणला हा अल्टीमेटम दिला आहे.

सरपंच म्हणाले की, कोल्हापूर-रत्नागिरी महामार्गावरील बांबवडे ही तालुक्याची मोठी बाजारपेठ आहे. महामार्गाचे प्रस्तावित विस्तारीकरण अनेक वर्षे रखडले आहे. मात्र, या काळात विद्यमान रस्त्याच्या झालेल्या दुरवस्थेकडे हायवे प्राधिकरणचे अक्षम्य दुर्लक्ष झाले आहे. बांबवडे ग्रामपंचायत ते पेट्रोल पंप दरम्यान रस्त्यावर पावसाचे पाणी साचल्याने वाहनधारकांना खड्ड्यांचा अंदाज येत नाही. विशेषकरून रात्रीच्या वेळी मोठ्या वाहनांच्या प्रखर प्रकाश दिव्यांमुळे या ठिकाणी अनेक दुचाकीस्वारांना जायबंदी व्हावे लागले आहे. बऱ्याचवेळा वाहनांचे नुकसान होऊन वित्तहानीची झळ बसली आहे.

यासाठी रस्त्याच्या बाजूला कायमस्वरूपी नाला बांधून साचणाऱ्या पाण्याची निर्गत केल्यास ही समस्या कायमची संपुष्टात येईल. परंतु अनेक वर्षे महामार्ग विभागाकडे पाठपुरावा करूनही किंबहुना शाहूवाडी तहसीलदारांना वेळोवेळी निवेदन आले आहे. परंतु, तात्पुरत्या मलमपट्टीशिवाय हा प्रश्न अद्यापही दुर्लक्षितच राहिला आहे. दुर्दैवाने हायवे प्राधिकरणकडून विस्तारीकरण कामाचा मुद्दा पुढे करून मूळ रस्त्यावरील दुरुस्ती कामाला बगल दिली जाते. परंतु, यापुढे पंधरा दिवसांत उपाययोजना न झाल्यास ग्रामस्थांनी घेतलेल्या आंदोलनाच्या निर्णयाला सरपंच म्हणून पाठिंबा देणार आहे, यानंतर कायदा सुव्यवस्था निर्माण झाल्यास संबंधित विभाग जबाबदार राहील, असा निर्वाणीचा इशारा सरपंच भगतसिंग चौगुले यांनी पत्रकार परिषदेत दिला.

हेही वाचा 

Back to top button