साखरेचा वापर 300 लाख टनाच्या उंबरठ्यावर! | पुढारी

साखरेचा वापर 300 लाख टनाच्या उंबरठ्यावर!

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : देशांतर्गत साखरेचा वापर 300 लाख मेट्रिक टनाच्या उंबरठ्याला स्पर्श करण्याच्या तयारीत आहे. साखरेचा हा वापर इथेनॉलकडे वळविण्यात येणार्या साखरेव्यतिरिक्त आहे. यामुळे साखरेचा हा वाढता वापर भविष्यात इथेनॉल निर्मितीवर परिणाम करणारा ठरू शकतो. देशात साखरेचा देशांतर्गत वापर प्रतिवर्षी 2.2 टक्क्यांनी वाढत आहे.

साखरेचा अतिरिक्त वापर, मधुमेहासारख्या जडणार्‍या आणि जीवनशैलीवर परिणाम करणार्‍या आजाराला आमंत्रण देणारा ठरतो हे सत्य असले, तरी साखरेच्या वापराविषयी आरोग्य विज्ञानाच्या क्षेत्रात जागृती होऊनही भारतात साखरेचा वापर वाढत आहे.जगभरात हा वापर सरासरी एक टक्क्याने वाढत असला, तरी भारतात मात्र त्याचे प्रमाण जागतिक सरासरीच्या दुपटीहून अधिक आहे.

भारतात साखरेचे उत्पादन आणि वापर यांच्या गेल्या 6 वर्षांतील आकडेवारीवर नजर टाकली तर भारतातील साखरेच्या वापरात गेल्या सहा वर्षांत सुमारे 40 लाख मेट्रिक टनाने वापर वाढल्याचे निदर्शनास येते आहे. याला प्रामुख्याने साखरेचा व्यापारी वापर जबाबदार आहे. मिठाई आणि शीतपेयांत वापरले जाणारे साखरेचे प्रमाण अधिक आहे. देशात 2021-22 मध्ये साखर उत्पादनाने 359 लाख मेट्रिक टनाचा उच्चांक गाठला होता. संबंधित साखर वर्षात साखर वापराचे प्रमाण 270 लाख मेट्रिक टनावर गेले होते, तर नुकत्याच संपलेल्या हंगामात 320 लाख मेट्रिक लाख टन साखर उत्पादित होऊन 290 लाख मेट्रिक टन साखरेचा वापर झाला आहे.

उष्णतेच्या लाटेचा हातभार

यंदा लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बाजारात साखरेची टंचाई निर्माण होऊ नये, यासाठी केंद्र सरकारने ऑक्टोबर ते मे या आठ महिन्यांमध्ये 196 लाख मेट्रिक टन साखर रीलिज ऑर्डरच्या माध्यमातून बाजारात आणण्यास परवानगी दिली होती. ही साखर गतवर्षातील याच कालावधीत वितरित केलेल्या साखरेपेक्षा 9 टक्क्याने अधिक आहे. निवडणुकीच्या काळात शीतपेयाचे प्रमाण वाढले गेले. त्याला देशातील उष्णतेच्या लाटेने मोठा हातभार लावला.

Back to top button