लोकसभा निवडणूक: सायंकाळी ५ वाजेपर्यंत उत्साहात ५८.३ टक्के मतदान

प्रातिनिधिक छायाचित्र.
प्रातिनिधिक छायाचित्र.

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा: लोकसभा निवडणुकीच्या अखेरच्या सातव्या टप्प्यात ८ राज्य व केंद्रशासित प्रदेशातील ५७ मतदारसंघात सायंकाळी ५ वाजेपर्यंत मोठ्या उत्साहात ५८.३ टक्के मतदान पार पडले.

पंतप्रधानांसह ४ केंद्रीय मंत्र्यांचे नशीब ईव्हीएममध्ये बंद

शेवटच्या टप्प्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाराणशी मतदारसंघात मतदान झाले. याशिवाय मोदी यांच्या मंत्रिमंडळातील ३ केंद्रीय मंत्र्यांचेही नशीब ईव्हीएम मशीनमध्ये बंद झाले. केंद्रीय मंत्री डॉ. महेंद्र नाथ पांडेय चंदौली येथून अनुप्रिया पटेल मिर्झापूरमधून आणि राज्यमंत्री पंकज चौधरी महाराजगंज मतदारसंघातून नशीब आजमावत आहेत. बिहारच्या आरा येथून केंद्रीय मंत्री आर.के. सिंह निवडणूक लढवत आहेत. पाटलीपूत्र येथून राजदचे नेते लालूप्रसाद यादव यांची कन्या मीसा भारती नशीब आजमावत आहेत.

दुपारी १ वाजेपर्यंत ४०.९ टक्के मतदान

अखेरच्या टप्प्यात उत्तरप्रदेश आणि पंजाबमधील प्रत्येकी १३ जागांसह पश्चिम बंगाल (९), बिहार (८), उड़ीसा (६), हिमाचल प्रदेश (४), झारखंड (३) आणि चंडीगडमधील (१) अशा एकूण ५७ मतदारसंघात दुपारी १ वाजेपर्यंत ४०.९ टक्के मतदानाची नोंद झाली.
उत्तरप्रदेशात ३९.३१ टक्के, पंजाबमध्ये ३७.८ टक्के, पश्चिम बंगाल ४५.७ टक्के, बिहार ३६.६५ टक्के, ओडिशा ३७.६४ टक्के, हिमाचल प्रदेश ४८.६३ टक्के, झारखंड ४६.८० टक्के तर चंडीगडमध्ये ४०.१४ टक्के मतदानाची नोंद झाली.

१० कोटी ६ लाख एकूण मतदार

शेवटच्या टप्प्यातील मतदान पार पाडण्यासाठी १ कोटी ९ लाख मतदान केंद्रांवर १० कोटी ९ लाख कर्मचारी तैनात करण्यात आले होते. या अंतिम टप्प्यात एकूण १० कोटी ६ लाख मतदारांची नोंद होती. त्यामध्ये ५ कोटी २४ लाख पुरुष आणि ४ कोटी २८ लाख महिला मतदारांचा समावेश होता.

पश्चिम बंगालमध्ये ईव्हीएम मशीन पळविल्या

पश्चिम बंगालमधील २४ परगणा जिल्ह्याच्या जयनगर मतदारसंघातील कुलताली येथे संतप्त जमावाने मतदान केंद्रातील ईव्हीएम मशीन आणि कागदपत्रे पळवून नेल्याची घटना घडली. या जमावाने निवडणूक साहित्य एका डबक्यात फेकून दिले. भाजप आणि माकपच्या विरोधात घोषणा देणाऱ्या या जमावात तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा समावेश असल्याचा आरोप आहे.

मिर्झापूरमध्ये १३ जणांचा मृत्यू

उत्तरप्रदेशच्या मिर्झापूरमध्ये मतदान केंद्रावर कार्यरत १३ निवडणूक कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या कर्मचाऱ्यांचा ताप आणि उच्च रक्तदाबामुळे मृत्यू झाल्याची माहिती आहे. मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्यांमध्ये ७ होमगार्ड जवान, ३ सफाई कर्मचारी, १ क्लार्क आणि एका शिपायाचा समावेश आहे.

ओडिशात दोघांचा मृत्यू

ओडिशातील जाजपूर जिल्ह्यात ओलईचंदनपूर येथील एका मतदान केंद्रातील कर्मचाऱ्याचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. बालासोर जिल्ह्यात मतदानासाठी रांगेत लागलेल्या एका वृद्ध व्यक्तीचा उष्माघाताने मृत्यू झाला.

गेल्या निवडणुकीत भाजपने जिंकल्या २५ जागा

गेल्या निवडणुकीत या टप्प्यात भाजपने २५ जागा जिंकल्या होत्या. त्यात उत्तरप्रदेशातील ९ बिहारमधील ५, हिमाचलप्रदेश ४, झारखंड, ओडिसा आणि पंजाबमधील प्रत्येकी २ आणि चंडीगडच्या एका जागेचा समावेश आहे. उत्तरप्रदेशातील सर्वात जास्त १३ पैकी ११ जागा भाजपने जिंकल्या होत्या. पंजाबमध्ये गेल्यावेळी भाजपने अकाली दलासोबतच्या युतीत २ जागा जिंकल्या होत्या. मात्र, आता भाजप स्वबळावर निवडणूक लढत आहे. पंजाबमध्ये चौरंगी सामना आहे.

हेही वाचा 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news