कोल्हापूर : अध्यापक महाविद्यालयांतील प्रवेश घटले | पुढारी

कोल्हापूर : अध्यापक महाविद्यालयांतील प्रवेश घटले

कोल्हापूर, कृष्णात चौगले : गेल्या बारा वर्षांपासून रखडलेल्या शिक्षक भरतीमुळे राज्यातील बी. एड. व डी.एल.एड.(डीएड) महाविद्यालयांतून दिवसेंदिवस प्रवेशांची संख्या घटत आहे. त्यात नवीन शैक्षणिक धोरणातील एकात्मिक अभ्यासक्रम अंमलबजावणीमुळे बारावीनंतर डी.एड. आणि पदवीनंतर केवळ बी. एड. महाविद्यालयांचे भवितव्य धोक्यात आले आहे. दुसरीकडे शिक्षक होण्यासाठीची पात्रता पूर्ण झालेले राज्यात जवळपास दोन लाख विद्यार्थी नोकरीच्या प्रतीक्षेत असून नव्याने शिकणार्‍या विद्यार्थ्यांचा कल आता कमी होत चालला आहे.

राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाद्वारे (सीईटी सेल) घेण्यात आलेल्या प्रवेश प्रक्रियेतून बीएड-एमएड इंटिग्रेटेड अभ्यासक्रमाला राज्यातून 83 विद्यार्थ्यांनी जूनअखेर प्रवेश निश्चित केले असून केवळ 260 विद्यार्थ्यांनी अर्ज केले आहेत. परिणामी, पदविका, पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रमा साठी प्रवेश घेणार्‍या विद्यार्थ्यांची संख्या दिवसेंदिवस घटत असून अध्यापक महाविद्यालये पुरेशा प्रवेशाअभावी बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. राज्यातील जवळपास दोन हजार प्राध्यापकांच्या जागा भरण्याची प्रक्रिया सध्या विद्यापीठ पातळीवर सुरू आहे.

नव्या शैक्षणिक धोरणाचा परिणाम

नव्या शैक्षणिक धोरणानुसार पूर्व प्राथमिक ते बारावीपर्यंतच्या वर्गात शिक्षक म्हणून शिकविण्यासाठी इंटिग्रेटेड टीचर एज्युकेशन प्रोग्राम (आयटीईपी) हा चार वर्षांचा अभ्यासक्रम तयार केला आहे. बारावीनंतर हा चार वर्षांचा कोर्स करावा लागणार आहे त्यामुळे बारावीनंतरचा डी.एड. अभ्यासक्रम बंद होणार आहे. पदवीनंतर दोन वर्षांचा बी.एड. अभ्यासक्रम बंद होऊन तो चार वर्षांचा इंटिग्रेटेड बी. एड. अभ्यासक्रम होणार आहे. बी.एड. महाविद्यालयांना एकतर पदवी अभ्यासक्रम आणि बी. एड. अभ्यासक्रम असा एकत्रित इंटिग्रेटेड बी. एड. अभ्यासक्रम तयार करावा लागेल, अन्यथा त्या महाविद्यालयांना टाळे लागणार आहेत. नवीन शैक्षणिक धोरणानुसार 2030 पर्यंत या अभ्यासक्रमाची अंमलबजावणी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

Back to top button