डॉ. ग. गो. जाधव अध्यासनामध्ये मल्टिमीडिया जर्नालिझम, डिजिटल लायब्ररी , पॉड कास्ट सुरू करावे : डॉ. प्रतापसिंह जाधव | पुढारी

डॉ. ग. गो. जाधव अध्यासनामध्ये मल्टिमीडिया जर्नालिझम, डिजिटल लायब्ररी , पॉड कास्ट सुरू करावे : डॉ. प्रतापसिंह जाधव

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा :  शिवाजी विद्यापीठातील पद्मश्री डॉ. ग. गो. जाधव अध्यासन हे देशातील पत्रकारितेचे पहिले अध्यासन आहे. भविष्यकाळाचा विचार करून एकाच ठिकाणी मल्टिमीडिया जर्नालिझम, नवनवीन अभ्यासक्रमांबरोबरच डिजिटल लायब्ररी, पॉड कास्ट या सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्यात. जेणेकरून अध्यासनात देशभरातील विद्यार्थी शिकण्यासाठी येतील यासाठी प्रयत्न करावेत, अशी सूचना दै.‘पुढारी’चे मुख्य संपादक डॉ. प्रतापसिंह जाधव यांनी केली.

शिवाजी विद्यापीठातील डॉ. ग. गो. जाधव पत्रकारिता अध्यासन इमारत बांधकामाची गुरुवारी डॉ. जाधव यांनी पाहणी करून काही सूचना केल्या. याप्रसंगी कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के, प्रभारी कुलसचिव डॉ. व्ही. एन. शिंदे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता एस. आर. पाटील प्रमुख उपस्थित होते.

डॉ. जाधव यांनी अध्यासन इमारत बांधकामाचा सविस्तर आढावा घेतला. ते म्हणाले, अध्यासन इमारतीचे बांधकाम पूर्ण केल्यानंतर चांगल्या प्रकारे लँड स्केपिंगसह इतर गोष्टी करता येतील. अध्यासन इमारतीमध्ये सर्व सोयींनी सज्ज, अद्ययावत ऑडिटोरियम, क्रोमा स्टुडिओ, कंट्रोल रूम, ऑडिओ, व्हिडीओ विंग तयार करण्यासाठी तज्ज्ञ व्यक्तीची नेमणूक करावी. अध्यासनात ये-जा करण्यासाठी मुख्य एकच प्रवेशद्वार असावे. विद्यार्थ्यांसाठी रोजगाराभिमुख नवनवीन कोर्सेस सुरू करावेत. तसेच विद्यार्थ्यांना बसण्यासाठी कॅफेट एरिया तयार करावा. 30 जुलैअखेर इमारतीचे सर्व बांधकाम पूर्ण करावे, अशी सूचना डॉ. जाधव यांनी केली.

कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के म्हणाले, अध्यासन इमारतीचे काम पूर्ण करताना पावसाळ्याच्या अनुषंगाने प्रत्येक गोष्टीची खबरदारी घ्यावी. अध्यासन नियुक्त करण्यात येणार्‍या कर्मचार्‍यांचा प्रस्ताव शासनास पाठविला आहे.

अभियंता डॉ. गिरीश कुलकर्णी यांनी, नॅशनल हायवेवरून इमारत दिसावी, या अनुषंगाने प्रवेशद्वाराची कमान उभारण्यात यावी, असे सांगितले. करण मिरजकर यांनी, साईन बोर्डसंदर्भातील माहिती दिली. यावेळी अध्यासनाचे समन्वयक डॉ. शिवाजी जाधव, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अनिता पाटील, हेमा जोशी, बांधकाम ठेकेदार सुनील नागराळे, उपकुलसचिव रणजित यादव, आर्किटेक्ट महेश डोईफोडे यांच्यासह विद्यापीठ, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

Back to top button