शाहूवाडीमध्ये ‘जल जीवन मिशन’ योजनेची कामे जोमात | पुढारी

शाहूवाडीमध्ये 'जल जीवन मिशन' योजनेची कामे जोमात

विशाळगड; सुभाष पाटील : गावं-वाड्यावस्त्यांवर नळाद्वारे ‘हर घर जल’ उपलब्ध व्हावे, यासाठी केंद्र व राज्य सरकारच्या वतीने ‘जल जीवन’ मिशन योजना राबविली जात आहे. या योजनेंतर्गत ‘शाहुवाडी’त १०५ गावांत पिण्याच्या पाणी योजना मंजूर असून ८६ कोटी ६९ लाख रुपये निधीमधून ही कामे केली जात आहेत. यापैकी ७२ योजनांची कामे प्रगतीपथावर आहेत तर ९ कामे पूर्ण झाली आहेत. आठ गावात मात्र जागा व राजकीय श्रेयवादामुळे कामे ठप्प असल्याची माहिती शाहूवाडी ग्रामीण पाणीपुरवठा उपविभागीय क्रमांक १२ चे अधिकारी आर. पी. भोंगळे यांनी दिली.

तालुक्यात बहुतांश गावांमध्ये उन्हाळ्यात पाणीटंचाई निर्माण होते. पाण्यासाठी रानोमाळ ग्रामस्थांना भटकावे लागते. राज्यात जलजीवन मिशन योजने अंतर्गत ग्रामीण भागातील पिण्याच्या पाणीटंचाई निवारणासाठी केंद्र व राज्य सरकार प्रत्येकी ५० टक्के खर्च घालून या योजना राबविल्या जात आहेत. या पाणी योजनांची कामे सर्वत्र सुरू असून मंजूर १०५ गावांसाठी ८६ कोटी ६९ लाख निधी उपलब्ध आहे. यापैकी ७२ योजनांची कामे अंतिम टप्प्यात असून पाणी टंचाईमुळे ही कामे पूर्ण होण्याच्या प्रतिक्षेत ग्रामस्थ आहेत. ही कामे पूर्ण झाल्यानंतर त्या गावांतील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटणार आहे. ज्या गावांत राजकीय श्रेयवादामुळे कामे अडली आहेत. तिथेही समोपचाराने कामे पूर्ण व्हावीत, अशी मागणी ग्रामस्थ करत आहेत.

‘या’ गावातील कामे पूर्ण

१०५ पैकी ९ पाणी योजना पूर्ण झाल्या आहेत. यामध्ये बजागेवाडी, भेडसगाव, करंजफेण (वाडाचीवाडी), खोतवाडी, लोळाणे, नेर्ले, शिरगाव, उखळू, येळाणे या गावांचा समावेश आहे. उर्वरित योजना पूर्ण करण्याचे प्रशासकडून प्रयत्न सुरू आहेत.

८ कामे राजकीय रस्सीखेच व जागेअभावी रखडली

काही गावांत योजना मंजुरीपूर्वी एका गटाची सत्ता व प्रत्यक्ष काम करण्याच्यावेळी दुसऱ्या गटाची सत्ता आल्याने तेथे श्रेयवादाचा विषय निर्माण झाला आहे. त्यामुळे आठ गावांतील कामे राजकीय रस्सीखेच तर काही जागेअभावी प्रलंबीत आहेत. यामध्ये आंबा, आरुळ, चांदोली, ओकोली, ससेगाव, शिंपे, सोनूर्ले, येलूर (जाधववाडी) या गावांचा समावेश आहे. ही कामेही लवकरच मार्गी लागतील असे सांगण्यात येत आहे.

प्रगतीपथावरील गावांची नावे : आकुर्ले, आळतुर, अमेनी (खोंगेवाडी), अनुस्कुरा, बहिरेवाडी, बांबवडे, बर्कि, भाडळे, भेंडवडे, बुरंबाळ, चरण, गजापूर-विशाळगड, गावडी, गेळवडे, गिरगाव, गोगवे (ठमकेवाडी), गोंडोली, हारुगडेवाडी, जांभुर-मालगाव, कडवे, कांडवन, कांटे-मरळे, करंजोशी, करूंगळे, कासार्डे, केर्ले, खेडे, कोळगाव, कोपार्डे, कोतोली, कुंभवडे, मालेवाडी (तुपारवाडी),  माण, मांजरे, मरळे, मोसम, नांदारी धनगरवाडा, पणुद्रे, म्हाळसवडे (धनगरवाडा), परळे-कोदे-मुटकलवाडी, परळे निनाई, परखंदळे, परळी (मांडवकरवाडी), पाटणे, पातवडे, पेंढाखळे, पेरिड, पिशवी, पुसार्ले, साळशी, सरूड, सावर्डे, सवते, सावे, सावर्डे बुद्रुक, शाहूवाडी-चनवाड, शेंबवणे, शित्तुर तर्फ मलकापूर, शित्तुर वारूण, शिवारे, सुपात्रे, टेकोली, थावडे, तुरुकवाडी, उचत, वडगाव, वरेवाडी-कुंभारवाडी, विरळे-पळसवडे, वाडीचरण, वालुर-जावळी, वारूळ, येळवणजुगाई.

  • शाहूवाडी तालुक्यात मंजूर योजना : १०५
  • एकूण मंजूर निधी : ८६ कोटी ६९ लाख
  • प्रगती पथावर असणाऱ्या योजना : ७२
  • पूर्ण झालेल्या योजना : ९
  • अडथळे असणाऱ्या योजना : ८

हेही वाचा : 

 

 

Back to top button